Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात नगरसेवक पदासाठी तब्बल १ कोटीची बोली, धक्कादायक माहिती समोर

पुण्यात नगरसेवक पदासाठी तब्बल १ कोटीची बोली, धक्कादायक माहिती समोर


पुण्यातील राजगुरूनगर नगरपरिषद निवडणुकीत एक धक्कादायक प्रकार समोर आल्याची चर्चा आहे. एका प्रभागात नगरसेवक पदासाठी गावकऱ्यांनी लिलाव केल्याचे वृत्त असून, सर्वसाधारण जागेसाठी एक कोटी रुपयांची, तर महिला राखीव जागेसाठी बावीस लाख रुपयांची बोली लागल्याची माहिती आहे. अनेक उमेदवार उभे राहून पैसे खर्च करण्यापेक्षा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावकऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या लिलावातून जमा होणारे पैसे गावातील मंदिर आणि सार्वजनिक इमारतींच्या सुधारणेसाठी वापरले जातील, असा दावा केला जात आहे. हा प्रकार राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. 

राज्यात सध्या नगर परिषद निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजगुरुनगर परिषदेच्या एका प्रभागामधील गावकऱ्यांनी वेगळा निर्णय घेतला. निवडणुकीत अनेक उमेदवार उभे राहणार आणि पैसे खर्च करणार, त्यापेक्षा प्रभागाची निवडणूक बिनविरोध करू, असे त्यांनी ठरवले. पण बिनविरोध निवडीसाठी त्यांनी अजब तोडगा काढला. त्यांच्या प्रभागातून सर्वसाधारण व महिला राखीव जागेवरचे दोन्ही उमेदवार लिलावाद्वारे निवडायचे. जे उमेदवार या पदांसाठी जास्त बोली लावतील, त्यांना इतर सर्व उमेदवारांनी पाठिंबा देऊन आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे ठरले. 

सर्वांत जास्त बोली लावणारे दोन्ही उमेदवार आता या प्रभागाचे नगरसेवक आणि नगरसेविका होण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी ठरल्याप्रमाणे बाकीच्या उमेदवारांनी माघार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे हा सर्व बोलीचा प्रकार प्रत्यक्षात येणार की नाही, हे माघारीनंतरच स्पष्ट होईल. या बोलीचे पैसे गावाच्या स्वाधीन करून ते गावातील विकासकामांवर व परिसर सुधारण्यावर तसेच सार्वजनिक इमारतींची सुधारणा करण्यावर खर्च करण्याचा गावकऱ्यांनी ठरवले आहे. मात्र असा लिलाव झाल्याच्या माहितीला अधिकृतपणे दुजोरा देण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.