महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट; काँग्रेस नेते नाना पटोलेंनी घेतली भाजपच्या 'या' नेत्याची भेट
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात काँग्रेसचा दबदबा निर्माण करण्यात तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मोठा वाटा राहिला. मात्र, लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेल्या नाना पटोले यांना विधानसभेत पक्षाचा धुव्वा उडाल्यानंतर काँग्रेसच्या पराभवाचं खापर त्यांच्यावर फोडण्यात आलं. यानंतर त्यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून नाना पटोले हे काहीसे अलिप्त आहेत. ही त्यांची वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, अशी चर्चा सुरू असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे.
महाराष्ट्रात विधानसभेनंतर पुन्हा एकदा निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. याचवेळी फोडाफोडी,नाराजी,कुरघोडीच्या राजकारणानेही चांगलाच वेग धरला आहे. अशातच आता काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजप नेत्याची भेट घेतली आहे.यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते आबित सिद्दिकी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली आहे.आबिद सिद्दिकी यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी ही भेट घेतल्याचं बोललं जात असलं तरी, या भेटीमागं मोठी राजकीय उलथापालथीच चर्चा विदर्भासह महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे. सिद्दीकी हे भाजपचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सदस्य आणि मुस्लिम समाजाचे नेते आहेत.
राज्यात कॉँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून 101 जागा लढवल्या होत्या. त्यात काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेला आकडा गाठणंही जमलं नाही.101 जागा लढवून अवघ्या 16 जागा काँग्रेसला जिंकता आल्या. पटोलेंच्या नेतृत्वात लढवल्या गेलेल्या निवडणुकीत काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांसारख्या दोन दिग्गज नेत्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.
विधानसभेत काँग्रेसला अपयश मिळाल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. नाना पटोले यांच्यावर दबाव होता. त्यानंतर त्यांनी दिल्लीत काँग्रेस हायकमांडशी चर्चा करुन राजीनामा दिला होता. यानंतर काँग्रेसनं हर्षवर्धन सपकाळ यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली.नाना पटोले हे महाराष्ट्र काँग्रेसचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळखला जातो. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात काँग्रेसच्या जुन्या जाणत्या बुजुर्ग नेत्यांचा विरोध पत्करत काही कठोर निर्णय घेण्यासही मागेपुढे पाहिले नव्हते. पण हेच पटोले हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात काँग्रेसमध्ये जास्त अॅक्टिव्ह नसल्याचंच दिसून येत आहे. ते काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान,त्यांनी भाजप नेत्याची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पटोले हे भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले होते. या निवडणुकीत शेवटपर्यंत चुरस कायम होती. या चुरशीच्या सामन्यात नाना पटोले कसेबसे जिंकले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 16 जागा मिळू शकल्या. काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष होता. पण गेल्या अनेक दशकांपासून पक्षाची कामगिरी घसरत चालली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.