Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाबळेश्वरमध्ये शिवसेनेला धक्का! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बहिणीचा राष्ट्रवादीत प्रवेश, नगराध्यक्षपदासाठी बंडखोरी मोडीत!

महाबळेश्वरमध्ये शिवसेनेला धक्का! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बहिणीचा राष्ट्रवादीत प्रवेश, नगराध्यक्षपदासाठी बंडखोरी मोडीत!


महाबळेश्वर : महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाबळेश्वरात नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदावरील बंडखोरी यशस्वीपणे मोडून काढली, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांची बहीण आणि माजी नगरसेविका विमल ओंबळे यांनी प्रभाग चारमधून आपला उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

या प्रवेशामुळे शिवसेनेला  मोठा धक्का बसला असून, राष्ट्रवादी काँग्रेसने महाबळेश्वरात राजकीय आघाडी घेतल्याचे संकेत मिळाले आहेत. महाबळेश्वर येथे नगराध्यक्षपदासाठी एकूण सात उमेदवारांनी एकूण नऊ अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी सुनील शिंदे यांना अधिकृत उमेदवारी दिल्याने उमेदवारीची अपेक्षा असलेल्या नासीर मुलाणी यांनी बंडखोरी करत स्वतंत्र अर्ज भरला होता.
मात्र, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी थेट महाबळेश्वरात येऊन मुलाणी यांची समजूत काढली. त्यांच्या विनंतीला मान देत मुलाणी यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. लोकमित्र जनसेवा आघाडीचे दुसरे उमेदवार राजेश कुंभारदरे यांनीही आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी आता पाच उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नगराध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शिंदे, लोकमित्र जनसेवा आघाडीचे डी. एम. बावळेकर, कुमार शिंदे, सतीश साळुंखे व संजय पाटील यांच्यात होणार आहे. नगरसेवकांच्या २० जागांसाठी ८३ उमेदवारांकडून ११४ अर्ज दाखल झाले होते. शेवटच्या दिवशी २२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ६३ उमेदवार अंतिम रिंगणात राहिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदासह सर्व २१ जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे सर्व जागांवर उमेदवार उभा करणारा हा एकमेव पक्ष म्हणून त्यांचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे. लोकमित्र जनसेवा आघाडीला यावेळी केवळ पाच उमेदवार मिळाले. या आघाडीतील अनेक संभाव्य उमेदवार राष्ट्रवादीत गेल्याने आघाडी कठीण परिस्थितीत आहे.

कुमार शिंदेंनी झटकली जबाबदारी

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी घेतलेल्या शिवसैनिक मेळाव्यानंतर महाबळेश्वरातील आपल्या भगिनी विमल ओंबळे यांची राजकीय जबाबदारी कुमार शिंदे यांच्यावर सोपवली होती. मात्र, नंतर त्यांनी अचानक ओंबळे यांचा पाठिंबा काढून त्यांच्या प्रतिस्पर्धी विमल बिरामणे यांना पाठिंबा जाहीर केला. ही बाब ओंबळे यांनी शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली, तरीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अखेर शिवसेनेचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असे समजते.

भाजपचे फक्‍त तीन उमेदवार
राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपला देखील महाबळेश्वरात उमेदवार मिळवण्यात अडचण भासली असून, कमळ चिन्हावर फक्त तीन उमेदवार रिंगणात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने बहुतेक संभाव्य उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.