Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉक्टरांनी औषधं दिली, महिलेने पाकीट उघडताच कॅप्सुलमधून अळ्या बाहेर, कल्याणमधील धक्कादायक प्रकार

डॉक्टरांनी औषधं दिली, महिलेने पाकीट उघडताच कॅप्सुलमधून अळ्या बाहेर, कल्याणमधील धक्कादायक प्रकार


कल्याणमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उपचारासाठी रुग्णालयातून दिलेल्या औषधांच्या कॅप्सूलमध्ये अळ्या आढळल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे. संबंधित रुग्ण महिलेने याबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल करून उत्पादक कंपनीची सखोल तपासणी करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कॅप्सूलवर काळपट डाग दिसल्याने उघडून पाहिलं तर अळ्या बाहेर पडल्या
कल्याण पश्चिमेत राहणारी मानसी राणे आपल्या आई सायली पनवेलकर यांना उपचारासाठी सोमवारी कल्याण पश्चिमेतील लालचौकी भागातील डॉ. केदार भिडे यांच्या इंदिरा रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या. सायली पनवेलकर यांच्या आईला हातदुखीची त्रास असल्याने डॉक्टरांनी तपासणी करून काही औषधांच्या गोळ्या दिल्या. रुग्णालयातून परतल्यानंतर, सायली पनवेलकर यांनी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांच्या पाकिटातील कॅप्सूल तपासण्यासाठी ते उघडले. कॅप्सूलवर काळपट डाग दिसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी कॅप्सूलचे बाहेरील आवरण फोडून पाहिले असता आतमध्ये औषधाच्या चुऱ्यासोबत अळ्या असल्याचे स्पष्ट दिसून आले. एक नव्हे तर दोन्ही कॅप्सूलमध्येच अळ्या असल्यामुळे त्यांचा धक्का बसला.

या प्रकारामुळे रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. औषधे देताना रुग्णालयाकडून किंवा औषध कंपनीकडून गंभीर निष्काळजीपणा झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अशा निकृष्ट आणि जीवघेण्या औषधांचा वापर रुग्णांच्या आरोग्यालाच थेट धोका निर्माण करू शकतो, असा आरोप त्यांनी केला.  या प्रकरणाची माहिती संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, औषध उत्पादक कंपनीची चौकशी करण्याची मागणी मानसी राणे यांनी केली आहे. त्यांनी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचेही आवाहन केले आहे. औषध निर्मिती प्रक्रियेत स्वच्छता आणि गुणवत्ता नियंत्रणाचा अभाव असल्याचे हे प्रकरण दर्शवते, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक पातळीवरही मोठी चर्चा सुरू झाली आहे. रुग्णालय प्रशासन आणि औषध कंपनीने या प्रकारावर काय स्पष्टीकरण देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा घटनांमुळे औषधांची गुणवत्ता, रुग्णालयांची जबाबदारी आणि आरोग्य यंत्रणेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. संबंधित औषध साठा तपासून योग्य ती कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.