कर्नाटकात घडामोडींना वेग! सतीश जारकीहोळी होणार उपमुख्यमंत्री? डी. के. शिवकुमारांचा 'तो' प्रस्ताव स्वीकारणार? मध्यरात्री दोघांची चर्चा
बंगळूर : राज्य काँग्रेसमधील सत्ता वाटपाचा हायकमांडचा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार सक्रिय झाले असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विश्वासू मंत्र्यांशी सलग बैठका सुरू आहेत. मंगळवारी त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी खासगी हॉटेलमध्ये दीर्घ चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार शिवकुमार यांनी सतीश जारकीहोळी यांना सत्ता वाटपाच्या प्रस्तावाला सिद्धरामय्या यांनी सहमती द्यावी, यासाठी त्यांना पटवून देण्याची विनंती केली. चर्चेदरम्यान 'सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार मी मुख्यमंत्री झालो, तर तुम्हाला केपीसीसी अध्यक्षपद मिळेल. तसेच तुम्हाला उपमुख्यमंत्रिपद मिळावे यासाठीही मी प्रयत्न करीन,' असे आश्वासन दिल्याची माहिती मिळते.
'सर्वांनी एकत्र येऊन काम करूया. २०२८ मध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणूया. सत्ता वाटपाचा गोंधळ दूर करा आणि सिद्धरामय्या यांच्याशी योग्यरीत्या बोला, असा संदेशही शिवकुमार यांनी जारकीहोळी यांना दिल्याचे सांगितले जाते. जारकीहोळी यांच्यापूर्वीही शिवकुमार यांनी मंत्री जमीर अहमद आणि प्रियांक खर्गे यांच्याशी चर्चा केली. हायकमांडचा निर्णय येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या वर्तुळातील सर्वांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.
शिवकुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. संपर्क साधल्यावर राहुल गांधींच्या फोनवरून 'एक मिनिट थांबा, मी तुमच्याशी संपर्क साधतो', असा संदेश आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. सत्ता वाटपाचा विवाद मिटविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे काल दिल्लीला रवाना झाले. ते उद्या किंवा परवा राहुल गांधींची भेट घेऊन राज्यातील घडामोडींचा अहवाल सादर करणार आहेत. खर्गे उद्या काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि रणदीपसिंग सुरजेवाला यांच्याशीही विस्तृत चर्चा करतील. सत्ता वाटपाचा हा अंतिम निर्णय या आठवड्यातच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिवकुमार गटाच्या आमदारांनी बदलला सूर
राज्यातील नेतृत्व बदलाच्या गोंधळावर तोडगा काढण्यासाठी शिवकुमार गटातील आमदारांचा सूर अचानक बदलला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात संधी शोधण्यासाठी दिल्लीला गेल्याचे भासवणारे हे आमदार आता हायकमांडने हस्तक्षेप करून गोंधळ सोडवावा, अशी मागणी करत आहेत.मागडीचे आमदार एच. सी. बालकृष्ण आणि मद्दूरचे आमदार कुडालुरू उदय यांनी दिल्लीला पोहोचताच पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नेतृत्व बदलाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची विनंती करणे हा त्यांच्या भेटीचा उद्देश आहे. हायकमांड योग्य वेळी स्पष्ट निर्णय घेईल, असा त्यांचा विश्वास आहे.
हायकमांडचा शिवकुमार यांना संदेश
'दिलेले वचन पाळण्यासाठी वेळ लागतो. तोपर्यंत शांत राहा', असा संदेश काँग्रेस हायकमांडने शिवकुमार यांना पाठवला असल्याचे समजते. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल ही धोक्याची घंटा आहे. मागासवर्गीयांची मते पक्षापासून दूर जात आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.