Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वातावरण फिरलं! शिंदेसेनेची काँग्रेससोबत युती; सोनिया गांधींसोबत एकनाथ शिंदेंचे झळकले फोटो

वातावरण फिरलं! शिंदेसेनेची काँग्रेससोबत युती; सोनिया गांधींसोबत एकनाथ शिंदेंचे झळकले फोटो


धाराशिव: उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत युती करून बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले, हिंदुत्व सोडले असा आरोप करून ठाकरेंपासून फारकत घेणारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने चक्क काँग्रेसशी युती केल्याचं समोर आले आहे.

राज्यात नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार जोरदार रंगत आला आहे. त्यात उमरगा नगरपरिषदेत शिंदेसेना, काँग्रेस, रयत क्रांती संघटना, लहुजी शक्ती सेना यांच्या युतीने अनेकांना आश्चर्यचकीत केले आहे. शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात काँग्रेसचा झेंडाही फडकवला जात आहे. त्याशिवाय शिंदेसेनेचे आमदार गळ्यात काँग्रेसचे उपरणं घालून घरोघरी प्रचार करतानाही दिसत आहेत.

विशेष म्हणजे शिंदेसेनेने काँग्रेससोबत केलेल्या या युतीवरून उद्धवसेनेच्या नेत्यांनी प्रहार केला आहे. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत ट्विट केले आहे. दानवे म्हणाले की, काँग्रेस नको म्हणून छाती बडवत सूरत गुवाहाटी गोवा असा पळपुटा प्रवास केलात आणि नाकाने वांगे सोलले. आता घ्या. कटप्रमुख एकनाथ शिंदे, सोनिया गांधी, राहुल गांधी एकाच बॅनरवर, ते ही धनुष्यबाण चिन्हासह...थोडक्यात दिल्लीश्वरांच्या भीतीने बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगले आहेत. यालाच म्हणतात बुडाखाली अंधार असा टोला दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
 
उमरगा नगर परिषद निवडणुकीत शिंदेसेना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची युती झाली आहे. या युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण गायकवाड हे आहेत. युतीच्या या उमेदवारांचे बॅनर आणि पत्रके यावर एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा फोटो पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियात हे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात उमरगा येथील काँग्रेस आणि शिंदेसेना युतीची जोरदार चर्चा सुरू आहे.

शिंदेंकडून ठाकरेंवर वार

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग केला. त्यामुळे २०१९ मध्ये सत्तांतर घडून मविआचं सरकार राज्यात आले. यानंतर २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेतली. शिंदेसोबत जवळपास ४० आमदार सत्तेतून बाहेर पडले. त्यामुळे मविआ सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत हातमिळवणी करत राज्यात सरकार बनवले. काँग्रेससोबत युती करून उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिले. हिंदुत्व सोडले असा आरोप सातत्याने शिंदेंकडून ठाकरेंवर केले जातात. मात्र उमरगा नगरपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने काँग्रेससोबत युती केल्यानं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यात अलीकडच्या काळात भाजपासोबत एकनाथ शिंदे यांचे संबंध ताणले गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.