महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी फडणवीस सरकारचे महत्त्वाचे आदेश! आता..
महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी महायुती सरकारने नुकतेच महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.
फडणवीस सरकारने जारी केलेल्या या आदेशानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सात नोव्हेंबर रोजी कामावर हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
खरेतर, देशभक्तीचा उत्साह पुन्हा जागवणारा ऐतिहासिक क्षण लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' याला यावर्षी ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने राज्य सरकारतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व स्तरांवर देशभक्तीचा जयघोष घुमणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्हे व तालुक्यांच्या ठिकाणी सामूहिक गान कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. हेच कारण आहे की या देशभक्तीपर सोहळ्यासाठी शासनाच्या सर्व विभागांतील शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबतचे एक महत्त्वाचे शासन परिपत्रक सुद्धा समोर आले आहे. तहसिलदार (सर्वसाधारण), पुणे यांनी सुद्धा राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून, हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत.
या वर्षपूर्ती निमित्ताने शिक्षण विभागाने आधीच ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 'वंदे मातरम्'च्या सर्व कडव्यांचे गायन करण्याच्या आणि गीताचा इतिहास सांगणारे प्रदर्शन शाळांच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली 'आनंदमठ' या कादंबरीतून 'वंदे मातरम्' हे गीत साकारले.
त्यातून उभारलेली राष्ट्रप्रेमाची भावना भारतीय स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा ठरली. या गीताने असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या हृदयात देशभक्तीची ज्योत पेटवली. १५० वर्षांनंतरही 'वंदे मातरम्' आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात समान अभिमानाने ध्वनित होत आहे.
या निमित्ताने होणारा सामूहिक गान कार्यक्रम देशभक्तीचा नवा उत्सव ठरेल. राज्यभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रगीताला अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.