Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुपरकॉप शिवदीप लांडे यांना बिहारी हिसका, दोन्ही मतदारसंघात बेदखल

सुपरकॉप शिवदीप लांडे यांना बिहारी हिसका, दोन्ही मतदारसंघात बेदखल


पाटणा : शिवदीप वामनरा लांडे या आयपीएस अधिकाऱ्याची यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीत जोरदार चर्चा होती. बिहारमध्ये असताना त्यांनी सिंघम स्टाईल गुन्हेगारांना टाचेखाली आणलं आणि गुन्हेगारी जगतावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे त्यांनी निवडणुकीत नशीब आजमावण्याचं ठरवलं. मात्र, जमालपूर (166) आणि असारिया (49) या दोन्ही मतदारसंघातून त्यांच्या पदरी निराशा आली आहे.

शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस सेवेचा राजीनामा दिला. अररिया, कटिहार, किशनगंज आणि पूर्णिया भागात अमली पदार्थांविरोधात त्यांनी जोरदार कारवाई केली होती. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या नावाची चर्चा होती. त्यांचा इतका दबदबा होता की गुन्हेगार घाबरायचे. पुर्णियामध्ये त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी 13 दिवसांनी राजीनामा दिला. बिहार सरकारने त्यांचा राजीनाम घेण्यास नकार दिला होता. मात्र, त्यानंतर राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर ते सेवामुक्त झाले. मात्र, त्यानंतरही बिहारी जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात पाऊल ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला. त्याची सुरुवात म्हणून त्यांनी विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली.

शिवदीप लांडे यांनी जमालपूर (166) मतदारसंघातून आणि अरारिया (49) मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. जमालपूरमध्ये 8 फेरीतील मतमोजणीनंतर त्यांना 2 हजार 73 मते मिळाली. या मतदारसंघात जनता दल युनायटेडचे नचिकेता यांनी 29 हजार 823 मते मिळवून आघाडी घेतली आहे. त्यांच्याखालोखाल महागठबंधनमधून IIP पक्षाचे उमेदवार नरेंद्र कुमार यांनी 17 हजार 728 मते मिळवली आहे.

अरारिया (49) मतदारसंघात शिवदीप लांडे यांना दहाव्या फेरीनंतर 1 हजार 5 मते मिळाली आहे. या मतदारसंघात जनता दल युनायटेड शगुफ्ता अझीम यांना 33 हजार 276 मते मिळाली आहे. तर काँग्रेसचे अबिदूर रेहमान यांना दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच 25 हजार 328 मते मिळाली आहेत. लांडे यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.

शिवदीप लांडे यांनी बिहारमधील गुन्हेगारीवर वचक मिळवला मात्र, निवडणुकीत त्याच बिहारी जनतेने त्यांना हिसका दाखवला आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडे पाठ फिरवली, असे चित्र आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर शिवदीप लांडे कोणती भूमिका जाहीर करतील, याची सर्वांना उत्सुकता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.