बिहारमध्ये प्रचार करतानाच 'बाहुबली' नेत्याची हत्या, जेडीयू उमेदवाराला अटक; भर रस्त्यात नेमका काय थरार घडला?
अनंत सिंह (डावीकडे) आणि दुलारचंद यादव (उजवीकडे) बिहारच्या मोकामा विधानसभा मतदारसंघातील बाहुबली नेता दुलारचंद यादव यांच्या हत्येच्या आरोपात बाहुबली नेता आणि मोकामातून जेडीयूचे उमेदवार असलेले अनंत सिंह यांना अटक करण्यात आली आहे.
या ट्रॅक्टर ट्रॉलीवर राष्ट्रीय जनता दल अर्थात आरजेडीच्या उमेदवार वीणा देवी, जनसुराजचे उमेदवार प्रियदर्शी पीयूष (प्रचलित नाव पीयूष प्रियदर्शी) चढले होते. लोकांची गर्दी हॉस्पिटलच्या दिशेनं ज्या मृतदेहाला घेऊन गेली, तो मृतदेह दुलारचंद यादव यांचा होता.
दुलारचंद यादव, 1980 आणि 1990 दशकातील 'बाहुबली' म्हणजे शक्तीशाली नेते होते. 30 ऑक्टोबरच्या दुपारी त्यांची बिहारमधील मोकामा इथं हत्या करण्यात आली. त्यानंतर मोकामा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे. 1990 सालची फक्त एक विधानसभा निवडणूक सोडली तर हा मतदारसंघ अनंत सिंह यांच्या कुटुंबाच्याच हातात राहिला आहे. या परिसरात अनंत सिंह यांना 'छोटे सरकार'देखील म्हटलं जातं.
दुलारचंद यादव यांची हत्या होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे बुधवारी (29 ऑक्टोबर) संध्याकाळी उशीरा टिकारी विधानसभा मतदारसंघातील हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे उमेदवार अनिल कुमार यांच्यावर देखील निवडणुकीचा प्रचार करत असताना हल्ला झाला होता.
निवडणुकीच्या या रणधुमाळी दरम्यान सिवान जिल्ह्यातील दरौंदा पोलीस ठाण्याच्या परिसरात अनिरुद्ध कुमार नावाच्या एएसआयची हत्या करण्यात आली. निवडणुकीच्या काळात होत असलेल्या या हिंसाचाराच्या घटना, बिहारमध्ये भूतकाळात निवडणुकीच्या काळात झालेल्या हिंसाचाराची आठवण करून देतात.
हिंसाचाराच्या या घटनांची सोशल मीडियावर बरीच चर्चा होते आहे. विशेषकरून दुलारचंद यादव यांच्या हत्येची चर्चा होते आहे. दुलारचंद यादव हे कधीकाळी नीतीश कुमार आणि लालू प्रसाद यादव या बिहारच्या राजकारणातील दोन्ही प्रमुख नेत्यांच्या जवळचे होते.वरिष्ठ पत्रकार विकास कुमार झा यांनी 'बिहार: क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात विकास कुमार यांनी लिहिलं आहे की, "मुंगेरपासून ते बेगूसरायच्या दियारा परिसरात क्रिमिनल गँग उघडपणे सक्रिय होत्या. दुलारचंद यादव देखील याच परिसरात खूप सक्रिय होते. 1991 मध्ये बाढ शहरात झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत लालू यादव यांनी दुलारचंद यांचा सार्वजनिकरित्या सन्मान केला होता."पारी मोकामामध्ये दुलारचंद यादव यांची हत्या करण्यात आली होती. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सचे बिहारचे समन्वयक राजीव कुमार म्हणतात, "यावेळेस सर्व उमेदवारांचं विश्लेषण व्हायचं बाकी आहे. मात्र, ज्या आमदारांवर गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी प्रकरणं आहेत, अशांची संख्या 2015 मध्ये 40 टक्के होती. तर 2020 मध्ये हे प्रमाण 51 टक्के होतं. यावेळेस या संख्येत वाढ होणार हे उघड आहे."
"ताकदवान उमेदवारांच्या विजयाची शक्यता अधिक असते. कारण त्यांच्याकडे पैसा, पॉवर असते आणि संपूर्ण व्यवस्थेत एकप्रकारची सामाजिक मान्यतादेखील असते." "आधी राजकीय पक्ष अशा ताकदवान उमेदवारांची निवड करते आणि मग जनता त्यांना निवडून देते. मोकामामध्ये झालेली घटना याच प्रक्रियेचा विस्तार आहे." ज्या मोकामा विधानसभा मतदारसंघात दुलारचंद यादव यांची हत्या झाली आहे, तो बिहारच्या हॉट सीटपैकी एक आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गंगा नदीच्या दक्षिण तटावर वसलेल्या पाटणा जिल्ह्यातील 14 विधानसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे मोकामा. या मतदारसंघातून अनंत सिंह जिंकत आले आहेत. पाटण्याच्या रस्त्यावर बग्गीतून जाणाऱ्या अनंत सिंह यांची मुलाखत आणि मीम्स सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेले आहेत.
जेडीयूनं त्यांना मोकामा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर आरजेडीनं सूरजभान सिंह या आणखी एका शक्तीशाली नेत्याची पत्नी वीणा देवी यांना उमेदवारी दिली आहे. जनसुराजनं या मतदारसंघातून पीयूष प्रियदर्शी यांना उमेदवारी दिली आहे.दुलारचंद यादव निवडणुकीत जनसुराजचे पीयूष प्रियदर्शी यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार करत होते. 30 ऑक्टोबरच्या दुपारी साधारण तीन वाजेच्या सुमारास तारतर गाव आणि बसावनचक नावाच्या जागेदरम्यान जेडीयूचे उमेदवार अनंत सिंह यांचा ताफा आणि पीयूष प्रियदर्शी यांच्या समर्थकांमध्ये चकमक झाली होतीपाटणा एसएसपी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटलं होतं की, "साडेतीन वाजता भदौरच्या पोलीस ठाण्यात माहिती मिळाली आहे की अनंत सिंह यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. अनंत सिंह यांच्या ताफ्याजवळ गेल्यावर माहिती मिळाली की जनसुराजच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे.""याच दरम्यान घोसवरी पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना माहिती मिळाली की तारतर गावाजवळ दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे. तिथे पोलीस पोहोचल्यावर, दोन-तीन चार चाकी वाहनांच्या काचा फुटलेल्या होत्या. तर एका व्यक्तीचा मृतदेह वाहनात होता. ही व्यक्ती दुलारचंद यादव असल्याची ओळख पटवण्यात आली आहे."
"पोलीस जवळपासच्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून माहिती घेत आहेत. एफएसएलची टीम घटनास्थळाचा तपास करते आहे. हा मृत्यू संशयास्पद आहे आणि शवविच्छेदनाचा अहवाल, सीसीटीव्हीचे फुटेज, तपासातून गोळा केलेले पुरावे यांच्या विश्लेषणानंतरच यामागचं कारण स्पष्ट होईल."
या प्रकरणात घोसवरी पोलीस ठाण्यात अनंत सिंह यांच्यासह पाच जणांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तसेच, आता या हत्येच्या आरोपामध्ये अनंत सिंह यांना अटक करण्यात आली आहे. पाटणा पोलिसांनी शनिवारी (1 नोव्हेंबर) रात्री उशीरा त्यांना अटक केली आहे.
अनंत सिंह म्हणाले, 'हा सूरजभान यांचा कट'
घोसवरी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये लिहिलं आहे, "रस्त्यात अनंत सिंह भेटले आणि दादांना (दुलारचंद यादव) शिव्या देऊ लागले. दादांनी शिवीगाळ न करण्यास सांगितलं. त्यावरून राजवीर सिंह आणि कर्मवारी सिंह यांनी दादांना गाडीतून बाहेर ओढलं." "दादा बाहेर येताच अनंत सिंह यांनी पिस्तूल काढलं आणि दादांच्या डाव्या पायाच्या टाचेवर गोळी झाडली. दादा खाली पडले. त्यानंतर छोटन सिंहनं लोखंडी रॉडनं दादांना मारलं आणि थार गाडीनं त्यांना चिरडलं."
या घटनेनंतर दुलारचंद यादव यांचे नातू रविरंजन प्रसारमाध्यमांना म्हणाले, "अनंत सिंह यांना 24 तासात अटक करण्यात यावी. तसंच आमच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्यात यावी. आमच्या दादांच्या (दुलारचंद) पायावर गोळी झाडून त्यांना गाडीखाली चिरडून मारण्यात आलं आहे. ते फक्त वातावरण शांत करायला गेले होते. मात्र, या लोकांनी त्यांची हत्या केली."या प्रकरणात घोसवरी पोलीस ठाण्यात अनंत सिंह यांच्यासह पाचजणांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अनंत सिंह यांनी हे आरोप नाकारले असून हा सूरजभान सिंह यांचा कट असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, "आम्ही टालमध्ये प्रचार करत होतो. एका जागी आम्ही पाहिलं की लोकांची गर्दी झाली आहे. आम्हाला वाटलं विरोधी पक्षाचे लोक प्रचार करत आहेत. आमच्या तीस गाड्या पुढे निघाल्या होत्या आणि दहा गाड्या मागे राहिल्या होत्या. त्यांच्यावर लोकांनी हल्ला केला. हा सर्व सूरजभान यांचा कट आहे."तर सूरजभान सिंह यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "या घटनेमुळे संपूर्ण देशाची बदनामी होते आहे. निवडणूक आयोगाला विनंती आहे की याचा तपास करण्यात यावा. एका निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणात चौकशी समिती नियुक्त करण्यात यावी." मात्र, अनंत सिंह यांनी सूरजभान सिंह यांच्यावर जे आरोप केले आहेत, त्यावर उत्तर देण्यास सूरजभान सिंह यांनी नकार दिला.लालू यादव आणि नीतीश कुमार यांच्याशी जवळीक असलेले दुलारचंद यादव 75 वर्षांचे दुलारचंद यादव मूळचे तारतर गावचे होते. मोकामा टालच्या या भागात त्यांचा खूप प्रभाव होता. ते स्वत:देखील इथून अनेकदा विधानसभेला उभे राहिले होते.वरिष्ठ पत्रकार सुरूर अहमद म्हणतात, "1995 च्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीचं वार्तांकन करण्यासाठी आम्ही गेलो होतो. ते बृजनंदन यादव यांच्याविरोधात उभे होते. त्यावेळे ते म्हणाले होते की लालू यादव बिहारचे मुख्यमंत्री असतील. मात्र, टालचा मुख्यमंत्री मी आहे.""त्या निवडणुकीत बृजनंदन जिंकले होते. मात्र त्यावेळेस दुलारचंद शिखरावर होते. त्यांची प्रतिमा अशा डाकूची होती, जो लाल झेंडा घेऊन दरोडा टाकायचा. आता याचा अर्थ काय आहे, हे सांगता येणार नाही."पाटणा पोलिसांनी देखील प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. त्यानुसार दुलारचंद यांच्यावर हत्या आणि आर्म्स ॲक्टअंतर्गत अनेक गुन्हे नोंदवलेले आहेत.आरजेडीच्या एका नेत्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, "1990 मध्ये नीतीश कुमार जेव्हा बाढ मतदारसंघातून लोकसभेला उभे राहिले होते, तेव्हा त्यांनी दुलारचंद यांची मदत मागितली होती. दुलारचंद यांचा मागासवर्गीय आणि अती मागासवर्गीय लोकांमध्ये खूप प्रभाव होता.""ते लोकांना पैशांची मदत करायचे. तारतरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नीतीश कुमार यांनी त्यांना बोलावलं होतं. त्याच कार्यक्रमातून ते मोकामाच्या राजकारणातील एक नवीन नाव म्हणून पुढे आले होते." या भागात दुलारचंद 'पहलवान जी' या नावानं प्रसिद्ध होते. तारतर या त्यांच्या गावात देखील लालू यादव यांनी पशुपालनाचं विद्यालय सुरू केलं होतं.पाटण्यातून निघणाऱ्या न्यूजब्रेक नावाच्या मासिकात पत्रकार कमल किशोर विनीत यांनी 2021 मध्ये दुलारचंद यादव यांच्या राजकारणावर एक लेख लिहिला होता. कमल किशोर यांनी या लेखात लिहिलं होतं, "या ताकदवान नेत्यावर लालूंची कृपा होती. आमदार नसतानादेखील त्यांना पाटण्यात फ्लॅट, टीव्ही आणि गाडी मिळाली होती. सत्तेच्या आडून, अनेक प्रसिद्ध बाजारपेठांमधून पैसे उकळण्याचा अधिकारदेखील त्यांना मिळाला होता."अर्थात, नंतरच्या काळात ते लालू प्रसाद यादव यांच्यापासून दूर गेले. मात्र, नंतर पुन्हा आरजेडीच्या जवळदेखील आले. अलीकडच्या दिवसांपर्यंत दुलारचंद यादव, आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनाच मुख्यमंत्री बनवण्याचा मुद्दा वारंवार मांडत होते. अशा परिस्थितीत प्रश्न येतो की मग त्यांनी जनसुराजचे उमेदवार पीयूष प्रियदर्शी यांचा प्रचार का केला?
बांकाचे रहिवासी असलेल्या 30 वर्षांच्या पीयूष प्रियदर्शी यांचं नाव पहिल्यांदा मोकामा टालमध्ये 2022 साली ऐकू आलं होतं. त्यावेळेस त्यांनी मोकामा विधानसभा मतदारसंघातून पोट निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं.
धानुक जातीतून येणाऱ्या प्रीयूष प्रियदर्शी यांनी लोकसभेची निवडणूक देखील लढवली. दुलारचंद यादव यांची इच्छा होती की यावेळेस आरजेडीनं पीयूष प्रियदर्शी यांना उमेदवारी द्यावी. मात्र आरजेडीनं वीणा देवी यांना उमेदवारी दिली. पीयूष प्रियदर्शी यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधूम मास्टर इन सोशल वर्क केलं आहे.
मोकामा मतदारसंघ : अनंत सिंह यांच्या कुटुंबाचा प्रभाव
1990 पासून मोकामा मतदारसंघातून अनंत सिंह यांचं कुटुंबच जिंकत आलं आहे. फक्त 2000 साली इथून सूरजभान जिंकले होते. तेदेखील शक्तीशाली नेते आहेत. 1990 मध्ये अनंत सिंह यांचे मोठे भाऊ दिलीप सिंह यांनी काँग्रेसच्या श्याम सुंदर सिंह धीरज यांचा पराभव केला होता.
1990 आणि 1995 मध्ये दिलीप सिंह या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर 2000 च्या निवडणुकीत सूरजभान जिंकले होते. मात्र 2005 च्या निवडणुकीपासून अनंत सिंह इथून लागोपाठ पाच वेळा जिंकले आहेत. अनंत सिंह तुरुंगात गेल्यानंतर 2022 च्या पोट निवडणुकीत अनंत सिंह यांनी त्यांची पत्नी नीलम देवी यांना उभं केलं होतं. त्यादेखील या मतदारसंघातून जिंकल्या होत्या.64 वर्षांचे अनंत सिंह साक्षर आहेत. त्यांच्यावर 28 गुन्हेगारी खटले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच आर्म्स ॲक्टच्या एका प्रकरणात त्यांची निर्दोष सुटका झाल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले होते. 1990 च्या निवडणुकीत, काँग्रेसचे नेते श्याम सुंदर सिंह धीरज यांचा अनंत सिंह यांचे मोठे भाऊ दिलीप सिंह यांनी पराभव केला होता.मोकामा मतदारसंघातून दोनवेळा आमदार झालेले आणि तीन वेळा मंत्री राहिलेले श्याम सुंदर सिंह धीरज बीबीसी म्हणाले, "संपूर्ण बिहारमध्ये सर्वच पक्षांनी लोकनेत्यांना हरवण्याची ही पद्धत शोधली आहे. ती म्हणजे ताकदवान व्यक्तीला त्या मतदारसंघातून उमेदवारी द्यायची. म्हणजे स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याला तिथून जिंकताच येणार नाही."
"निवडणुकीच्या आदी आमच्याकडे जी परवाना असलेली शस्त्रं आहेत, त्यांची मोजदाद होते. मात्र इथे प्रचार करताना देखील लोक बंदूका घेऊन फिरत आहेत." याच वर्षी जानेवारी महिन्यात सोनू-मोनू नावाचे दोन भाऊ आणि अनंत सिंह, त्यांचे समर्थक यांच्यात गोळीबार झाला होता.
मोकामा : कधीकाळी होतं औद्योगिक केंद्र
पाटण्यातील फतुहापासून लखीसराय मतदारसंघापर्यंतच्या भागाला 'टाल' असं म्हटलं जातं. हा भाग डाळी, कडधान्यांच्या लागवडीसाठी सुपीक मानला जातो. कधीकाळी म्हणजे 1893 मध्ये या भागात प्रसिद्ध शिकारी आणि निसर्गप्रेमी जिम कॉर्बेट यांची ट्रान्स शिपमेंट इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती झाली होती. इथल्या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे हा भाग आंतरदेशीय जलवाहतूक आणि रेल्वेचं मोठं केंद्र होतं.त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर या भागात अनेक कारखाने उभारण्यात आले. युनायटेड स्प्रिट (मॅकडॉवेल), नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन, भारत वॅगन अँड इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड आणि बाटा लेदर फॅक्टरी इत्यादी कारखाने इथे होते.मात्र हळूहळू हे सर्व कारखाने बंद पडत गेले. त्यानंतर हा सर्व भाग फक्त बाहुबली म्हणजे ताकदवान नेत्यांसाठी ओळखला जाऊ लागला. दुलारचंद यादव यांच्या हत्येनंतर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवत लिहिलं, "मुद्द्यांच्या भीतीनं घोषणाबाजी करणाऱ्या पंतप्रधान मोदींना त्यांचं गुंडाराज आणि महाजंगलराज दिसत नाही."तर जेडीयू प्रवक्ते नीरज कुमार यांनी या घटनेचा निषेध करत म्हटलं की कायदा त्याचं काम करेल. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए 'जंगलराज'ला मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करतं आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या काळात झालेल्या या हिंसाचारामुळे नीतीश सरकारची 20 वर्षांची राजवट आणि थ्री सी म्हणजे क्राईम, करप्शन आणि कम्युनलिझम यांच्याबाबतीत झीरो टॉलरन्स असण्याच्या धोरणावर प्रश्न उपस्थित होतात. कधीकाळी बिहारची ओळख जातीय हिंसाचार, निवडणुकीतील हिंसाचार आणि ताकदवान नेत्यांचं राज्य अशी झाली होती. आता पुन्हा एकदा बिहारची वाटचाल त्याच दिशेनं होते आहे का? हा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.