Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दीड लाख घेऊनही पुन्हा ३० हजारांची मागणी; लाचखोर एसीबीच्या वकिलालाच एसीबीने पकडले!

दीड लाख घेऊनही पुन्हा ३० हजारांची मागणी; लाचखोर एसीबीच्या वकिलालाच एसीबीने पकडले!

छत्रपती संभाजीनगर : लाचेच्या प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर त्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील न करण्यासाठी दीड लाख रुपये घेऊनही पुन्हा ५० हजारांसाठी तगादा लावून त्यापैकी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक सरकारी वकील शरद बन्सी बांगर (४३) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली.

जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांच्याच दालनातून त्यांना बुधवारी दुपारी जालना एसीबी पथकाने अटक करून वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

तक्रारदार छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. २२ मार्च २०२२ रोजी लाच घेतल्याच्या प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी ते त्यात निर्दोष सुटले. मात्र, त्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील न करण्यासाठी ॲड. शरद बांगर यांनी त्यांना २ लाखांची मागणी केली होती. त्यापैकी दीड लाख रुपये तक्रारदाराने बांगरला दिले दिले होते. उर्वरित ५० हजारांसाठी बांगर त्यांना सातत्याने त्रास देत होते. गेल्या काही दिवसांपासून बांगरने सहायकाच्या क्रमांकावरून त्यासाठी तगादा लावला होता. यामुळे संतप्त सहायक फौजदाराने एसीबी अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे याप्रकरणी तक्रार केली.

पडताळणीत निष्पन्न, मात्र पैसे स्वीकारले नाही
अधीक्षक कांगणे यांच्या आदेशावरून जालन्याचे एसीबीचे उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांनी तक्रारीची खातरजमा केली. त्यात बांगरने ५० हजारांऐवजी तडजोडी अंती ३० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार १७ नोव्हेंबर रोजी न्यायालयात सापळा लावण्यात आला. मात्र, बांगर कार्यालयात आले नाही. त्यांनी तत्काळ तक्रारदाराला तुम्ही आता तुमच्याच वकिलाला बोला, असे सांगितले. शिवाय, एका सहकाऱ्याकडे एसीबीने सापळा लावल्याचा संशय आल्याचे बोलून दाखवले. १८ नोव्हेंबर रोजी पुन्हा सापळा रचण्यात आला. मात्र, बांगर यांनी लाच घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे लाच मागितल्याचे सबळ पुरावे असल्याने जाधवर, पोलिस निरीक्षक कोमल शिंदे यांच्या पथकाने त्यांना बुधवारी अटक केली.

बांगर एसीबीचे सरकारी वकील
ऑक्टोबर २०१५ मध्ये सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेले बांगर सध्या छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वकील होते. त्यांच्या सर्व प्रकरणांत तेच सरकारी पक्षाकडून बाजू मांडत होते. त्यामुळे बांगर यांना एसीबीचे सापळे, त्यांचे शब्द, सापळ्यांच्या पद्धतीची माहिती होती. त्यामुळेच तक्रारदार पैसे आणून देतो, काही कमी करा, असे म्हणाला तेव्हाच बांगर यांना संशय आला व पैसे घेण्यापासून ते दूर गेले. मात्र, तोपर्यंत त्यांनी लाच मागितल्याचे पुरावे पथकाला मिळाले होते. ज्यांचे प्रतिनिधित्व केले, त्याच एसीबी पथकाला त्यांना अटक करावी लागली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.