Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...

एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...

नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर शंभरहून अधिक लोकांची नोंदणी आहे. एकाचा पत्ता सुलभ शौचालय आहे, काय बसल्या बसल्या सही घेतली काय?, असा सवाल उपस्थित करत मनसेप्रमुख राज ठाकरे  यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला होता.

तसेच सदर प्रकरणाबाबत विविध बातम्या देखील समोर आल्या होता. आता नवी मुंबई महापालिकेच्या  आयुक्तांच्या निवासावर 130 मतदार नोंदणीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीसंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तपत्रांमध्ये "नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या निवासावर 130 मतदारांची नोंदणी" अशी बातमी प्रकाशित झालेली आहे. सदर बातमीसंदर्भात मतदार नोंदणी अधिकारी, 151-बेलापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या अहवालानुसार ही बाब वास्तवाशी विसंगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदार यादी भाग क्रमांक 300 मध्ये "नेरुळ सेक्टर 21, नेरुळ रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप मार्ग, आयुक्त निवास' असे सेक्शनचे नाव नमूद आहे. येथे "मनपा आयुक्त निवास" हे केवळ विभागाचा (सेक्शन) ठळक ओळखचिन्ह  म्हणून नमूद करण्यात आलेले आहे. या यादीभागातील कोणत्याही मतदाराचा पत्तामध्ये / वर "नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निवासस्थान" असे नमूद नाही. त्यामुळे संबंधित बातमीत नमूद केलेली "130 मतदारांची नोंदणी आयुक्तांच्या निवासावर झालेली आहे" ही माहिती वास्तवाशी विसंगत आहे, असं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे यांनी माहिती दिली.

सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर निवडणूक अधिकारी काय म्हणाले? 

मतदार यादी भाग क्रमांक 148 संदर्भात वृत्तपत्रात नमूद करण्यात आलेल्या "सुलभ शौचालय" विषयक उल्लेखाबाबत तपास करण्यात आला असता, सदर ठिकाण दोन मजली असून पहिला व दुसरा मजला वास्तव्यासाठी वापरात असल्याचे निदर्शनास आले आहे. तेथील मतदार हे या पूर्वी त्या ठिकाणी वास्तव्यास होते, मात्र सध्या त्या तेथून स्थलांतरित झालेल्या असून विहित कार्यपद्धतीनुसार त्यांचे नाव वगळण्याची कार्यवाही सुरु आहे. मतदार नोंदणी अधिकारी, 151-बेलापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या अहवालानुसार, वृत्तपत्रात प्रकाशित बातमीत कोणतेही प्रकारचे तथ्य आढळून नाही, असे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केले आहे.

मतदार याद्या स्वच्छ करा, मग निवडणुका घ्या- राज ठाकरे 

मतदार याद्या स्वच्छ करा, मग निवडणुका घ्या. एक वर्ष आणखी लागलं तरी चालेल. मतदार याद्या जेव्हा स्वच्छ होतील त्यावेळी ज्याचा विजय होईल तो आम्हाला मान्य आहे. आज देशातील प्रत्येक राजकीय पक्ष आणि मतदारांच्या मनात देशाच्या निवडणुकांबाबत शंका निर्माण झाली आहे. क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग झालं त्यावेळी अझरुद्दीन, जडेजा यांना काढून टाकलं. इथं मॅच फिक्स असूनही कोणाला काढत नाही, असं राज ठाकरेंनी सांगितले. मतदार उन्हा-तान्हात रांगेत उभा राहून मतदान करतो, पण निकाल जर चुकीचे लागणार असतील तर तो मतदाराचा अपमान आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात महाराष्ट्र सैनिकांनी गेलं पाहिजे. त्यातून दुबार मतदार संपवण्यासाठी काम केलं पाहिजे. मी नेहमी सांगतो माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. या जन्मामध्ये या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे यासाठी मी स्वप्न पाहतोय, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.