विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 12,000 शिष्यवृत्ती; वार्षिक उत्पन्न 3.50 लाख रुपये अन् आठवीत पाहिजे ५५ टक्के गुण
राष्ट्रीय दुर्बल घटक योजना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत (एनएमएमएस) इयत्ता आठवीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. ज्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळते. केंद्र सरकारच्या वतीने ही शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षी डिसेंबर महिन्यात ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते.
केंद्राच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मानसिक क्षमता चाचणीअंतर्गत तर्क आणि विचारशक्ती तपासणारे ९० प्रश्न विचारले जातात. तसेच शैक्षणिक क्षमता चाचणीअंतर्गत विज्ञान, गणित, समाजशास्त्र (इतिहास, भूगोल) यावर आधारित प्रश्न असतात. परीक्षेत एकाच दिवशी दोन पेपर घेतले जातात. तर्क, विज्ञान, गणित, समाजशास्त्र या सारखे विषय असतात आणि यासाठी कौटुंबिक उत्पन्न व मागील वर्गातील गुणांची अट असते.इयत्ता आठवीनंतर विद्यार्थ्यांची गळती थांबवणे आणि गुणवत्तावान विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणे हा या परीक्षेमागील उद्देश आहे. मराठी, इंग्रजी व हिंदी अशा तिन्ही भाषांमधून विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. शिष्यवृत्तीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खात्यात पुढे चार वर्षे म्हणजेच इयत्ता बारावीपर्यंत दरवर्षी १२ हजार रुपये जमा केले जातात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी परीक्षेचे ठोस नियोजन केले आहे.
परीक्षार्थींसाठी पात्रता अशी...
इयत्ता आठवीमध्ये सर्वांसाठी किमान ५५ टक्के गुण तर एससी, एसटी प्रवर्गासाठी ५० टक्के गुण आवश्यक.
विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साडेतीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थीच परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
२८ डिसेंबरच्या परीक्षेत झूम कॅमेरे
राज्यातील १३ हजार ७८९ शाळांमधील दोन लाख ५० हजार ५३२ विद्यार्थ्यांची २८ डिसेंबर रोजी ७५८ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. ११ जिल्ह्यातील अतिसंवेदनशील २७ केंद्रांवरील पर्यवेक्षकांचे झूम कॅमेरे सुरु ठेवले जाणार आहेत. जेणेकरून कॉपीमुक्त परीक्षा व्हावी, यादृष्टीने नियोजन केले आहे. त्या दिवशी सकाळी साडेदहा ते दुपारी बारा या वेळेत बौद्धिक क्षमता चाचणीचा पहिला पेपर तर दुपारी दीड ते तीन या वेळेत शालेय क्षमता चाचणीचा दुसरा पेपर होणार आहे. दोन्ही पेपर प्रत्येकी ९० गुणांचे असणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.