कर्नाटकातील चित्तदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग ४८ वर एक भयावह रस्ता अपघात घडला. गोरलाथू गावाजवळ बंगळुरूहून शिमोगाकडे जाणाऱ्या खाजगी बसची समोरून येणाऱ्या लॉरीशी जोरदार टक्कर झाली.
या धडकेनंतर बसला लगेच आग लागली आणि त्यात अडकलेल्या प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर किमान नऊ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
क्षणांतच आगीने वेढले
अपघात इतका भीषण होता की बसने काही क्षणांतच आगीने वेढले. अनेक प्रवासी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटनेची माहिती मिळताच हिरियुर ग्रामीण पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. जखमी प्रवाशांना त्वरित हिरियुर आणि चित्तदुर्ग येथील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बसला समोरून धडक
प्राथमिक तपासात पोलिसांना आढळले आहे की लॉरी चालकाने रस्त्यावरील दुभाजक ओलांडला आणि बसला समोरून धडक दिली. या धडकेमुळे बसला आग लागली असावी. पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की लॉरी चालकाला झोप लागली असावी, ज्यामुळे त्याने वाहनावरचे नियंत्रण सुटले. लॉरी चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, अपघाताच्या नेमक्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.
राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील वाहतूक बराच वेळ ठप्प
या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. जळालेली वाहने आणि इतर अवशेष रस्त्यावरून हटवल्यानंतर आणि आग पूर्णपणे विझवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गांवर वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे आणि झोपेमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना शोक व्यक्त करताना राज्य सरकारकडून मदत जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.