नाशिक : गुन्हेगारीचे स्वरुप बदलत असून तंत्रज्ञान जसजसे विकसीत होत आहे, त्याप्रमाणात सायबर व आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा गुन्ह्यांना हाताळण्यासाठी पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे महत्वाचे ठरते. त्यासाठी कालसुसंगत ज्ञान नेहमी आत्मसात करायला पाहिजे. सध्या समाजात शालेय स्तरापासून अंमली पदार्थांचा होणारा मोह ही पोलिसांसमोरील महत्वाची आव्हाने आहेत. या विषयावर जनजागृती तसेच कठोर कारवाई करावी, असे प्रतिपादन नाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी केले.
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्यावतीने बुधवारी आयोजित प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षांत सोहळा प्रबोधिनीच्या मैदानावर पार पडला. कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जगमलानी यांनी प्रशिक्षणार्थीकडून मानवंदना स्वीकारल्यानंतर मार्गदर्शन केले. सत्र क्रमांक १२६ मधील ३२२ पुरुष व ६७ महिला असे एकुण ३८९ सरळसेवा प्रशिक्षणार्थी यांचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे दीक्षांत संचलन पार पडले. यावेळी प्रबोधिनीचे सहसंचालक अरविंद साळवे यांनी प्रशिक्षणार्थींना पद व गोपनीयतेची शपथ दिली.न्या. जगमलानी यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक, नक्षलग्रस्त भागातील काम करणारे पोलीस घटक यांची आजवरची कामगिरी निश्चीत उल्लेखनीय असल्याचे सांगितले. गुन्हे प्रतिबंध, गुन्हे अन्वेषण तसेच कायदा व सुव्यवस्था राखणेकामी जनतेचा सहभाग हा नेहमीच आवश्यक असतो. जनता व पोलीस यामध्ये सुसंवाद राखण्याच्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी कार्यरत राहणं महत्वाचे आहे. पोलीस कारवाई दरम्यान मानवाधिकारांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. जनताभिमुख काम करतांना पोलिसांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पड़ता निष्पक्ष व पारदर्शक कारभार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रियंका पाटील 'मानाची रिव्हॉल्व्हर'ची मानकरी
प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र १२६ मधील विशेष प्राविण्य मिळविलेल्या विविध पारितोषिक प्राप्त प्रशिक्षणार्थीचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून मानाची रिव्हॉल्वर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने प्रियंका पाटील या प्रशिक्षणार्थीस सन्मानित करण्यात आले. सर्वोकृष्ट महिला प्रशिक्षणार्थी पुरस्कारही प्रियंकाला मिळाला, दीपक घोगरे यास व्दितीय सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी कवायत वैभव डोंगरे, सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी कायदा व अभ्यासक्रम प्रियंका पाटील, सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी-गोळीबार पवन गोसावी, सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी (बाह्यवर्ग) दीपक घोगरे यांना सन्मानित करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.