'हलक्यात घेऊ नका आम्ही मुंबई बंद करू" जरांगे पाटलांचं थेट अमित शहांना आव्हान; 'आरोपींना 8 दिवसांत अटक करा नाहीतर. '
मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी शाळकरी विद्यार्थी शौर्य पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी शौर्य पाटील मृत्यू प्रकरणात केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करावी, दोषी शिक्षकांवर कठोर कारवाई करावी तसेच संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली. दिल्लीतील पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सवाल करत या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली.
शौर्य पाटील मृत्यू प्रकरण
दरम्यान, याच मुद्द्यावर महाराष्ट्रातील मविआचे खासदारांनीही अमित शाह यांची भेट घेतली. शौर्य पाटील मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी खासदारांकडून करण्यात आली. या भेटीत अमित शाह यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी नेमण्याचं आश्वासन दिलं. उद्याच एसआयटी नेमण्याबाबत सूचना देण्यात येतील, असंही अमित शाह यांनी सांगितल्याची माहिती आहे. खासदार निलेश लंके यांनी अमित शाह यांना पत्र दिलं असता, शरद पवार यांचंही याबाबत पत्र आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालानुसार शौर्य पाटील यांच्या मृत्यूस शाळा आणि शिक्षकच जबाबदार आहेत. त्यामुळे या अहवालानुसार तरी पाटील कुटुंबीयांवर अन्याय होऊ देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनाचा इशारा
आठ दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत जरांगे पाटील म्हणाले की, गरज पडली तर मुंबई बंद करू शकतो. आमच्या मुलाचं बलिदान वाया जाणार नाही. मराठ्यांचा एक मुलगा मेला आहे, याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणात लक्ष घालावं, अशी मागणी त्यांनी केली.
मनोज जरांगे आक्रमक
अमित शाह यांची भेट घेणार का, असा सवाल विचारला असता त्यांना सगळं कळत नाही का, असा प्रतिप्रश्न जरांगे पाटील यांनी केला. तसेच आरोपींना 8 दिवसांत अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. शाळेच्या संस्थापकांना इशारा देताना जरांगे पाटील म्हणाले की, राष्ट्रगीत झालं पाहिजे असं सांगणारा राष्ट्राभिमानी मुलगा होता. शाळेच्या नावाखाली दया आणि शांतीचा संदेश दिला जातो, मग आमच्या मुलासोबत असं का केलं, असा सवाल करत त्यांनी शाळेच्या संस्थापकांना थेट इशारा दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.