Big News ! हातभट्टी ज्यांच्या जमिनीवर त्या मालकावरच आता दाखल होणार गुन्हे; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांचा इशारा; तलाठी, ग्रामसेवकांना पत्र
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क, ग्रामीण पोलिसांनी सतत कारवाई करूनही जिल्ह्यातील हातभट्ट्या पूर्णत: विझलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर आता ज्यांच्या जागेत हातभट्टी आहे, त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जाणार आहेत. कारवाईवेळी ती जमीन तथा जागा कोणाची, याची माहिती तलाठ्यांकडून घेऊन त्या मालकावरच गुन्हे दाखल होतील, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र शासनाने महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी जून २०२५ मध्ये उत्पादन शुल्कात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे देशी-विदेशी दारू आणि बिअरच्या किंमत वाढल्या आहेत. विशेषतः भारतीय बनावटीच्या विदेशी दारूवरील उत्पादन शुल्क तीन पटीवरून साडेचार पटीपर्यंत वाढले आहे. देशी-विदेशी दारुची विक्री घटली असून अनेकजण हातभट्टीच्या नादी लागले आहेत.सोलापूर जिल्ह्यातील मुळेगाव तांडा, शिवाजी नगर, तळे हिप्परगा, गुळवंची, दोड्डी यासह अन्य ठिकाणी हातभट्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील हातभट्ट्यांवरील कारवाई वाढविली आहे. पथकाने मंगळवारी दहिटणे ते बक्षी हिप्परगा रोडवर हातभट्टीसाठी मळी घेऊन जाणारा पिकअप पकडला. दुसरीकडे शिवाजी नगर व गुळवंची येथील हातभट्यांवरही छापेमारी केली. दोन्ही कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
आता जागा मालकावरच गुन्हे दाखल करणार
महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९मधील कलम १३३ व १३४ नुसार अवैध किंवा बनावट मद्यनिर्मिती, वाहतूक, बाळगणूक, विक्रीची माहिती गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनी आम्हाला देणे अपेक्षित आहे. दुसरीकडे कलम १३५ नुसार ज्या जागेत किंवा जमिनीवर अवैध मद्याचे धंदे सुरु आहेत, त्या जमीन मालकावर गुन्हे दाखल होतो. त्यानुसार आता आम्ही कारवाई करणार आहोत.
- भाग्यश्री जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर
शिवाजी नगर तांड्यावर अवैध धंदेवाल्यांची दहशत
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुळवंची व शिवाजी नगर (ता. उत्तर सोलापूर) येथील तांड्यावर छापेमारी केली. यात ११ गुन्हे दाखल करून पाच जणांना अटक केली. त्याठिकाणी २७ हजार २५० लिटर गुळमिश्रित रसायन व ५३५ लिटर हातभट्टी नष्ट करण्यात आली. हातभट्ट्या नष्ट करण्यासाठी मशिन बोलावण्यात आली, पण हातभट्टी चालकांच्या दहशतीमुळे कोणतीही मशिन घेऊन आले नाही. काही जणांनी अधिकाऱ्यांशीच बाचाबाची केल्याचाही अनुभव यावेळी आला. या पार्श्वभूमीवर आता हातभट्टी चालकांसह त्या जागा मालकांवरही गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.