डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत संपूर्ण शरीरात पसरला संसर्ग; अवघ्या २८ वर्षांच्या तरुणीचा ऑफिसमधील 'या' एका सवयीमुळे मृत्यू, तुम्हीही अशीच चूक करता का?
दैनंदिन धावपळीत अनेक सवयी आपल्या अंगवळणी पडतात. काही सवयी किरकोळ वाटतात, तर काहींकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. मात्र, याच सवयी कधी कधी जीवावर बेतू शकतात, याची कल्पनाही अनेकांना नसते. अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे आणि त्यात अवघ्या २८ वर्षांच्या तरुणीला जीव गमवावा लागला.
सुरुवातीला साधा अशक्तपणा, थकवा आणि किरकोळ त्रास, अशी लक्षणे दिसत होती. कुटुंबीयांनाही फारसं काही गंभीर वाटत नव्हतं. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती झपाट्याने बिघडली. डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत संसर्गानं संपूर्ण शरीरात हात-पाय पसरले होते. त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही तरुणीचा जीव वाचवता आला नाही.
ही तरुणी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अदिती शर्मा यांची रुग्ण होती. त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती देताना एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आणली आहे. मृत्यूमागे कोणताही अपघात, गंभीर आजार किंवा जन्मजात दोष नव्हता, तर दैनंदिन आयुष्यातील एक दुर्लक्षित सवय तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरली.
नेहमी दुर्लक्षित केली जाणारी सवय
डॉक्टरांनी रुग्णाचा वैद्यकीय इतिहास तपासला आणि कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केली. तेव्हा लक्षात आलं की, ही तरुणी शरीराची एक नैसर्गिक गरज वारंवार दाबून ठेवत होती. सुरुवातीला त्याचे परिणाम किरकोळ वाटले; पण हळूहळू शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होऊ लागला.डॉ. अदिती शर्मा यांच्या मते, ही समस्या आजकाल केवळ महिलांपुरती मर्यादित राहिलेली नाही. पुरुषांमध्येही ही सवय वाढताना दिसते आहे. मात्र, महिलांच्या बाबतीत सार्वजनिक ठिकाणांवरील अस्वच्छतेमुळे ही सवय अधिक प्रमाणात आढळते.
तिसऱ्यांदा झाला संसर्ग
ही तरुणी एका खासगी कार्यालयात कार्यरत होती. रोज प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा लागत असल्याने ती अनेकदा शरीराची गरज लांबवत असे. प्रवासादरम्यान ती तासन् तास लघवी रोखून धरत असे. याआधीही तिला दोन वेळा मूत्रमार्गाशी संबंधित संसर्ग झाला होता.
रोज तासन् तास लघवी दाबून ठेवणारी २८ वर्षांची तरुणी अचानक गंभीर परिस्थितीत सापडली. वारंवार संसर्ग सहन करताना, वेळेत उपचार न मिळाल्यामुळे संसर्ग हळूहळू तिच्या शरीरात पोहोचला. शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होऊ लागले आणि डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. ही दुर्घटना लघवी तुंबवून ठेवण्याच्या सवयीमुळे घडली, जी बहुतेक लोकांना असते; पण त्या सवयीचा दुष्परिणाम धक्कादायक ठरला. रुग्णालयात दाखल होईपर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. डॉक्टरांच्या मते, वेळेत उपचार मिळाले असते, तर कदाचित परिस्थिती वेगळी दिसू शकली असती.
स्वतःची काळजी कशी घ्याल?
तज्ज्ञांनी याबाबत स्पष्ट सल्ला दिला आहे की, शरीराच्या नैसर्गिक गरजा कधीही दाबून ठेवू नयेत. पाणी पिणे टाळू नये. बाहेर पडण्यापूर्वी आणि कामाच्या ठिकाणी पोहोचताच मूत्रविसर्जनाची शरीराची आत्यंतिक गरज पूर्ण करणं आवश्यक आहे. महिलांना उभं राहून वापरता येणारी विशेष उपकरणं उपलब्ध आहेत, जी अस्वच्छ ठिकाणी उपयोगी ठरू शकतात. ही उपकरणं पुन्हा वापरता येणारी, तसेच एकदाच वापरून टाकण्यायोग्य स्वरूपात मिळतात.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
मूत्र करताना जळजळ, दुर्गंधी, कमी प्रमाणात मूत्र बाहेर पडणं किंवा वेदना जाणवत असतील, तर तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारण- तुम्हाला अगदी किरकोळ वाटणारी ही समस्या पुढे गंभीर रूप धारण करू शकते.
*(सूचना : या लेखातील माहिती सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या अनुभवांवर आधारित आहे. याची खात्री, अचूकता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी आम्ही घेत नाही. कोणताही उपाय किंवा बदल करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)*
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.