Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हाधिकारी टीना डाबींच्या अडचणीत वाढ; काँग्रेस खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

जिल्हाधिकारी टीना डाबींच्या अडचणीत वाढ; काँग्रेस खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी


राजस्थानमधील प्रसिद्ध आयएएस अधिकारी आणि बाडमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी सध्या एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. आंदोलक विद्यार्थिनींनी 'रील स्टार' म्हटल्याच्या रागातून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे खळबळ उडाली असून, आता या प्रकरणात लोकप्रतिनिधींनी उडी घेतली आहे. बाडमेर-जैसलमेरचे काँग्रेस खासदार उम्मेदाराम बेनीवाल यांनी टीना डाबी यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

‘फक्त रील बनवण्यात मग्न’ – खासदारांचा हल्लाबोल
खासदार उम्मेदाराम बेनीवाल यांनी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. बेनीवाल म्हणाले की, “जिल्हाधिकारी टीना डाबी जमिनीवर (ग्राउंड लेव्हलवर) कोणतेही काम करत नाहीत. कोणत्याही कार्यक्रमात गेल्यावर त्या फक्त रील बनवण्यात मग्न असतात. विद्यार्थिनींनी काहीही चुकीचे बोलले नव्हते, त्यांनी फक्त सत्य परिस्थिती मांडली होती. त्या ऐकून घेण्याऐवजी त्यांना पोलीस ठाण्यात पाठवणे हे अत्यंत निषेधार्ह आहे.”
लोकप्रतिनिधींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

टीना डाबी यांचा लोकप्रतिनिधींशी असलेला व्यवहारही योग्य नसल्याचा दावा खासदारांनी केला आहे. “जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधींची कामे करत नाहीत आणि बैठकांमध्ये विचारलेल्या प्रश्नांना उत्तरेही देत नाहीत. आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करणार आहोत,” असेही बेनीवाल यांनी स्पष्ट केले.

काय आहे नेमकं प्रकरण?
काही दिवसांपूर्वी बाडमेरमध्ये काही समस्यांना घेऊन विद्यार्थिनी आंदोलन करत होत्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना ‘रील स्टार’ असे संबोधण्यात आले. यावरून पोलिसांनी काही विद्यार्थिनींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. या घटनेनंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

या प्रकरणात वाढता विरोध पाहता जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी (SP) यापूर्वीच पोलिसांच्या कारवाईबद्दल खेद व्यक्त केला आहे. मात्र, आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.