सांगलीत भाजपमध्ये नाराजीनाट्य, बंडखोरांनी थोपटले दंड; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
सांगली : भाजपच्या संभाव्य उमेदवारांची नावे समोर येताच पक्षात नाराजीनाट्य सुरू झाले आहे. पक्षांतर्गत राजकारणाचा फटका बसलेल्या इच्छुकांनी बंडाचे निशाण हाती घेतले असून, काहींनी विरोधी महाआघाडी, राष्ट्रवादी ( अजित पवार) व शिंदेसेनेची वाट धरली आहे.
तर, काहींनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. या बंडखोरांना थोपविण्याचे आव्हान भाजप नेत्यांसमोर आहे.
महापालिका निवडणुकीसाठी २० प्रभागांतील ७८ जागांवर भाजपकडे सर्वाधिक ५२९ इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. त्यात तिकीट वाटपाचा घोळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होता. रविवारी सायंकाळी भाजपकडून संभाव्य उमेदवारांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. भाजपकडून माजी नगरसेवकांसह २० हून अधिक मातब्बर उमेदवारांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या काँग्रेसच्या माजी नेत्यांच्या समर्थकांंना उमेदवारी देताना पक्षाशी निष्ठावंत असलेल्या अनेकांना डावलले गेले आहे. भाजपमधील गटबाजीतून अनेकांचा पत्ता कापला गेला आहे. त्यातून एका पदाधिकाऱ्याने पक्षनेत्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले, तर महिला कार्यकर्त्याने रक्ताने पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली होती. भाजपच्या संभाव्य उमेदवारांची नावे बाहेर येताच पक्षातील इच्छुकांनी आता बंडाचे निशाण हाती घेतले आहे. यातील काहींनी विरोधी पक्षांशी संधान साधले आहे.
भाजपच्या माजी नगरसेविका अनारकली कुरणे, गजानन मगदूम, माजी उपमहापौर मोहन जाधव, सिद्राम दलवाई यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर, विश्वजित पाटील यांनी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. झोपडपट्टी समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. राजेंद्र मुळीक यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करून मैदानात उतरले आहेत. प्रत्येक प्रभागात नाराज इच्छुकांनी बंडखोरीची तयारी केल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. या बंडखोरांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, महायुतीत दोनच पक्ष
महायुतीतून शिंदेसेना बाहेर पडली आहे. भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा निष्फळ ठरली. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने आधीच स्वतंत्र लढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे जनसुराज्य व रिपाइं या दोन पक्षांना सोबत घेत भाजप रिंगणात उतरला आहे. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दोन्ही राष्ट्रवादीसोबत काँग्रेस, उद्धवसेनाही सोबतीला असेल. याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी होणार आहे.
शिवप्रतिष्ठान मैदानात
शिवप्रतिष्ठानने भाजपकडे तीन जागांची मागणी केली होती. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्याशी भाजप नेत्यांची चर्चाही केली. पण, केवळ प्रभाग १४ मध्ये एका जागेवर शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे. अन्य दोन जागांवर त्यांना डावलण्यात आल्याने शिवप्रतिष्ठानचे बंडाचा झेंडा फडकवला असूनगावभागात अपक्ष उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
ब्राम्हण समाजाचे शिष्टमंडळ गाडगीळांच्या भेटीला
प्रभाग १४ मधून भाजपकडून केदार खाडिलकर यांना डावलण्यात आले. आतापर्यंतच्या निवडणुकीत गावभागात ब्राम्हण समाजाला प्रतिनिधीत्व देण्यात आले होते. पण, यंदा समाजाचा एकही उमेदवार या प्रभागात नसेल. त्यामुळे ब्राम्हण समाजाच्या शिष्टमंडळाने आमदार सुधीर गाडगीळ यांची भेट घेतली. यावेळी खाडीलकर यांच्या उमेदवारीचा आग्रह धरण्यात आला. आ. गाडगीळ यांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नंदकुमार बापट, अरुण कुलकर्णी, प्रदीप ताम्हणकर, मंगेश ठाणेदार, नितीन खाडिलकर, शैलेश केळकर, वल्लभ सोहनी, रणजीत पेशकार, प्रथमेश वैद्य, सचिन परांजपे उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.