Big Breaking! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा पाठलाग, भाजपचे दोन आमदारही ताफ्यात, नाशिकमध्ये राडा
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून अनेक इच्छुक उमेदवार तिकीट मिळण्यासाठी धावपळ करत आहेत. त्यातच नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
नाशिकमध्ये भाजपच्या तिकीट वाटपाचा थरार रस्त्यावर दिसून आलेला आहे. शहराध्यक्ष सुनील केदार यांचा इच्छुक उमेदवाराकडून पाठलाग केल्याची माहिती समोर येत आहे. आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे या सुद्धा या ताफ्यामध्ये आहेत. इच्छुक उमेदवार आपल्याला तिकीट मिळावे या मागणीसाठी थेट एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करत असल्याने नाशिकमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा पाठलाग
गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षात निष्ठावंत कार्यकर्ते तिकिटांची मागणी करत होते. मात्र भाजपकडून निष्ठावंतांना डावलले जात होते. आता ऐनवेळी काही इतरांना तिकीट दिली जात आहेत. त्यामुळे काही इच्छुक उमेदवारांकडून शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या गाडीचा पाठलाग केला जात आहे. शहराध्यक्षांच्या गाडीच्या मागे इच्छुक उमेदवार एबी फॉर्म घेण्यासाठी पाठलाग करत आहेत. पंचवटी आणि नवीन सिडको परिसरातील हे उमेदवार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अर्ध्या ते एक तासापासून नाशिक-मुंबई महामार्गावर हा थरार पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाशिकमधील भाजपचा तिकीट वाटपाचा घोळ समोर आला आहे. तिकिट वाटपाच्या या थरारामुळे नाशिकची निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.
कारागृहात असलेल्या भाजप नेत्याच्या मुलाला भाजपकडून तिकीट
दरम्यान, कारागृहात असलेल्या भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांना भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उद्धव निमसे हे धोत्रे खून प्रकरणातील आरोपी असून सध्या ते कारागृहात आहेत. तथापि, संबंधित प्रभागातील पक्षीय बलाबल आणि राजकीय ताकद लक्षात घेऊन भाजपने रिद्धीश निमसे यांना उमेदवारी दिल्याची माहिती समोर येत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रिद्धीश निमसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्यासोबत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्हाला निश्चितच विजय मिळेल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.