बांगलादेशात कंडोमचा प्रचंड तुटवडा; कारण काय? युनूस सरकारला कशाची भीती?
भारताच्या सीमेला लागून असलेल्या बांगलादेशला सध्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अलीकडच्या काळात घडलेल्या हिंसक घटनांमुळे देशात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर बांगलादेशातील हिंदूंना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. या घटनांमुळे भारतात संतापाची लाट उसळली असून, दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. यादरम्यान मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या महिनाभरापासून बांगलादेशात कंडोमचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे देशाच्या महत्त्वाकांक्षी कुटुंब नियोजन कार्यक्रमावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याविषयीचा हा आढावा…
कंडोमच्या तुटवड्यामागचे कारण काय?
कंडोम हा कुटुंब नियोजनाचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. त्याच्या अभावामुळे देशात अनियोजित गर्भधारणा वाढण्याचा धोका आहे. त्याशिवाय लैंगिक आजारांचा प्रसार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. देशातील सरकारी साठवणूक केंद्रांमधून होणारा पुरवठा विस्कळित झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कंडोमच्या खरेदीसाठी आवश्यक असलेल्या निविदा प्रक्रियेत झालेला विलंब आणि परकीय चलनाच्या तुटवड्यामुळे त्याच्या आयातीवर परिणाम झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो, अशी भीतीही आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बांगलादेशात कंडोमचा किती साठा?
बांगलादेशच्या कुटुंब नियोजन महासंचालनालयाकडे फक्त ३९ दिवस पुरेल इतकाच कंडोमचा साठा आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा तुटवडा आणखीनच वाढण्याची शक्यता तेथील अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. केवळ कंडोमच नव्हे, तर बांगलादेशातील इतर गर्भनिरोधक साधनांची स्थितीही चिंताजनक आहे. ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयातील परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आम्हाला प्रत्येक महिन्याला गर्भनिरोधक गोळ्यांची २५० पाकिटे मिळायची; परंतु आता फक्त ३० ते ४० पाकिटांचा पुरवठा होत आहे, अशी माहिती बारिशालमधील चार कोराई रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने ‘डेली स्टार’ला दिली. या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना कुटुंब नियोजन संचालनालय विभागाचे प्रमुख अब्दुल अब्दुल रज्जाक यांनी सांगितले की, कंडोमच्या खरेदीवरून सध्या कायदेशीर वाद सुरू आहे. हा वाद मिटल्यास लवकरच सर्व रुग्णालयांना कंडोमचा पुरवठा केला जाईल.
कंडोमचा तुटवडा का निर्माण झाला?
आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशात काही वर्षांपासून कंडोमच्या पुरवठ्यात सातत्याने घट होत आहे. २०२३ मध्ये आरोग्य मंत्रालयाने एका वर्षासाठी कंडोम व गर्भनिरोधक गोळ्यांची खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कंडोमचा निधी इतर वस्तूंच्या खरेदीसाठी वापरण्यात आला. परिणामी पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाल्याने कुटुंब नियोजन कार्यक्रमाकडे दुर्लक्ष झाले. गेल्या सहा वर्षांत बांगलादेशातील कंडोम पुरवठ्यात तब्बल ५७ टक्क्यांची घट झाली. २०१९ मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत ९७.४८ लाख कंडोम वितरित करण्यात आले होते. २०२४ मध्ये ही संख्या घटून ४७.६५ लाखांवर आली. या वर्षी सप्टेंबरपर्यंत केवळ ४१.५२ लाख कंडोमचा पुरवठा करण्यात आला आहे. इतर गर्भनिरोधक औषधांच्या बाबतीतही हीच परिस्थिती असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
लोकसंख्येत वाढ होण्याची भीती
बांगलादेशात कंडोमचा तुटवडा निर्माण होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. कंडोमचा पुरवठा सुरळीत न झाल्यास देशातील लोकसंख्येत अनियंत्रित वाढ होऊ शकते. त्यामुळे अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य व्यवस्था आणि एकूणच विकास प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. बांगलादेश हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. सध्या देशातील एकूण लोकसंख्या १८ लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच बांगलादेशचा एकूण प्रजनन दर वाढून २.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. आधीच लोकसंख्या वेगाने वाढत असताना कुटुंब नियोजन साधनांच्या कमतरतेमुळे हा दर आणखी वाढण्याची भीती तेथील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
आरोग्य तज्ज्ञांचा इशारा काय?
बांगलादेश ऑब्स्टेट्रिकल अँड गायनॅकोलॉजिकल सोसायटीच्या माजी अध्यक्ष डॉ. फिरदोसी बेगम फ्लोरा यांनी ‘द डेली स्टार’शी बोलताना याबाबत गंभीर इशारा दिला आहे. देशात दीर्घकाळापासून कंडोमची टंचाई जाणवत आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास त्याचे लोकसंख्या व अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतील. वाढत्या लोकसंख्येमुळे अन्न, पाणी, आरोग्य, शिक्षण व रोजगार यांसारख्या मूलभूत सुविधांवर ताण येईल, ज्यामुळे देशातील गरिबी, गुन्हेगारी आणि असमानता वाढेल. कंडोमच्या कमतरतेमुळे अनपेक्षित गर्भधारणेत वाढ होऊ शकते. त्यामुळे गर्भपाताचे प्रमाण वाढून महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. सरकारने लवकरात लवकर या परिस्थितीवर तोडगा काढणे गरजेचे आहे. लोकसंख्या अधिक असलेल्या बांगलादेशसारख्या देशात कंडोमचा पुरेसा पुरवठा हा राष्ट्रीय प्राधान्यक्रम मानला पाहिजे, असे डॉ. फिरदोसी बेगम यांनी स्पष्ट केले आहे.
बांगलादेशात प्रचंड हिंसाचार
आरोग्य सुविधांचे संकट उभे ठाकले असतानाच बांगलादेशातील हिंसाचारातही मोठी वाढ झाली आहे. भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखला जाणारा विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. हादीवर १२ डिसेंबर रोजी अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. सिंगापूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी बांगलादेशात झालेल्या क्रांती आंदोलनाचे नेतृत्व हादीने केले होते. त्याच्या आंदोलनामुळेच माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. हादीच्या मृत्यूनंतर राजधानी ढाका येथे हिंसक आंदोलने सुरू झाली. त्यादरम्यान जमावाने एकापाठोपाठ एक दोन हिंदू तरुणांची हत्या केली. त्यामुळे भारत आणि बांगलादेशमधील संबंध आणखीनच बिघडले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.