नागपूर : नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडवून दिली आहे. 'जसे शनिशिंगणापूरला दरवाजे नाहीत, तसे आमच्या पक्षालाही दरवाजे नाहीत. कोणीही येतो, कोणीही जातो. या सगळ्या गोष्टींचे आम्ही जिल्ह्यात मूल्यांकन करू,' असे सूचक विधान मुनगंटीवार यांनी केले असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या वक्तव्यामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे अनुभवी व प्रभावी नेते मानले जातात. राज्याच्या राजकारणात त्यांनी अनेक वर्षे महत्त्वाची भूमिका बजावली असून अर्थमंत्री, वनमंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. मात्र अलीकडे स्थापन झालेल्या राज्य मंत्रिमंडळात त्यांना स्थान न मिळाल्याने ते पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्या ताज्या वक्तव्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे.
शनिशिंगणापूर हे गाव घरांना दरवाजे नसल्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच संदर्भाचा वापर करत मुनगंटीवार यांनी पक्षाची तुलना केल्याने त्यामागे केवळ रूपक नसून खोल राजकीय अर्थ असल्याचे मानले जात आहे. पक्षात सध्या शिस्त, संघटनात्मक बांधणी आणि निर्णयप्रक्रिया ढिली पडल्याचा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी दिल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. 'कोणीही येतो' या वाक्यातून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पक्षप्रवेशांवर त्यांनी भाष्य केल्याचे दिसते, तर 'मूल्यांकन करू' या विधानातून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत आढाव्याचे संकेत दिले आहेत. भाजपने गेल्या काही काळात विविध पक्षांतील नेत्यांना मोठ्या प्रमाणावर प्रवेश दिला आहे. त्यामुळे काही ठिकाणी जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे चित्र आहे. मुनगंटीवार यांच्या वक्तव्यातून हाच असंतोष व्यक्त झाल्याचे मानले जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात मुनगंटीवार यांचा मोठा प्रभाव आहे. मात्र जिल्ह्यात भाजप नेतृत्वाने प्रारंभी अपक्ष आमदार आणि नंतर भाजपमध्ये आलेले आमदार किशोर जोरगेवार यांना ताकद दिल्याने मुनगंटीवार यांची राजकीय ताकद पद्धतशीरपणे कमी केली जात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे वक्तव्य केवळ प्रतिक्रिया नसून भविष्यातील राजकीय हालचालींचे संकेत मानले जात आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.