Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हुबळीजवळ 'सैराट'; बापाकडून गर्भवती मुलीचा खून

हुबळीजवळ 'सैराट'; बापाकडून गर्भवती मुलीचा खून


बेळगाव/हुबळी : जात काही केल्या जात नाही, ही मानसिकता आजही समाजात अस्तित्वात असल्याचे दाखवणारी थरारक घटना हुबळीजवळील एका खेड्यात घडली आहे. आंतरजातीय मुलाशी विवाह केला म्हणून बापासह तिच्या घरच्यांनी स्वतःच्या गर्भवती मुलीच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. यामध्ये सहा महिन्याच्या गर्भाचाही अंत झाला आहे. कुटुंबाने मुलगीचा पती आणि सासरच्या लोकांवरही शेतवडीत हल्ला करून गंभीर जखमी केले आहे.

हुबळी तालुक्यातील इनाम विरापूर येथे ही अंगावर शहारे आणणारी घटना रविवारी सायंकाळी घडली. मान्या विवेकानंद दोड्डमणी (वय 19) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या हल्ल्यात तिचा पती विवेकानंद (वय 22) व सासू रेणव्वा व सासरा देखील गंभीर जखमी आहेत. हुबळी ग्रामीण पोलिसांनी मान्याचे वडील प्रकाशगौडा पाटील तसेच वीरनगौडा पाटील व अरुणगौडा पाटील यांच्यासह अन्य आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तिघांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार व जिल्हा पोलीस प्रमुख गुंजन आर्य यांनी माध्यमांना सांगितले की, आठ महिन्यांपूर्वी मे 2025 मध्ये मान्यता पाटील या 19 वर्षीय तरुणीने याच गावातील विवेकानंद दोड्डमणी नामक तरुणाशी प्रेमविवाह केला. तेव्हा तरुणीच्या कुटुंबियांनी तीव्र आक्षेप घेतला. गावात तणाव निर्माण झाल्यानंतर तहसीलदार व पोलिसांनी या दोन्ही कुटुंबीयांना बोलावून दोघेही सज्ञान असल्याने त्यांच्या लग्नात कुणालाही हस्तक्षेप करता येत नाही, असे समजावून सांगितले. शिवाय त्यांच्या जिवाला धोका झाल्यास तुम्ही जबाबदार असाल, असा इशारा देत प्रतिबंधात्मक गुन्हा दाखल केला होता.

हावेरीला गेले अन् परत आले

पोलीस प्रशासन व तालुका प्रशासनाच्या समोर प्रकरण मिटले असले तरी या नवदांपत्याच्या मनात आपल्या जिवाला काही तरी धोका करतील, अशी भिती घर करून होती. त्यामुळे लग्नानंतर हे दांपत्य हावेरीला रहायला गेले होते. गावातील वातावरण शांत झाले असेल असे समजून मान्या व विवेकानंद हे दोघेजण 8 डिसेंबर रोजी पुन्हा गावी इनाम विरापूरला आले होते. मान्या ही पतीसोबतच राहात होती.

अंतर्गत राग धुमसता
प्रशासनाने मान्याच्या घरच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तरीही त्यांच्या मनात उच्च-नीच जातीचा राग धुमसतच होता. विवेकानंद व त्याचे वडील रविवारी 21 रोजी शेतात काम करत होते. यावेळी मान्याच्या घरातील लोकांनी दोघांना शेतात गाठत दोघांवरही धारदार शस्त्रांनी हल्ला करत जखमी केले. मात्र मान्याच्या वडिलांनी मुलासह दोडमणींच्या घरी जाऊन तेथे असलेल्या मान्यावर व तिची सासू रेणव्वा हिच्यावरही धारदार शस्त्राने हल्ला केला. मान्या हिच्या पोटावर व डोकीत वर्मी घाव बसले. तिला रूग्णालयात नेताना तिचा मृत्यू झाला. उर्वरित तिघांपैकी पती, सासूची प्रकृतीही गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.