Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हिंगोली पोलिस दलात दोन पोलीस अधीक्षक; आदेश कुणाचे मानायचे, कर्मचाऱ्यांत संभ्रम.

हिंगोली पोलिस दलात दोन पोलीस अधीक्षक; आदेश कुणाचे मानायचे, कर्मचाऱ्यांत संभ्रम.


हिंगोली: जिल्हा पोलीस दलात सध्या अभूतपूर्व प्रशासकीय संभ्रम निर्माण झाला असून पोलीस अधीक्षक पदावरून 'खुर्चीचा खेळ' सुरू आहे. विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकृष्ण कोकाटे यांच्या जागी डॉ. नीलाभ रोहन यांची नियुक्ती होऊन त्यांनी पदभार स्वीकारला. मात्र, बदली आदेशाला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने स्थगिती दिल्याने एकाच पदावर दोन अधिकारी असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गोंधळात 'नेमके आदेश कुणाचे पाळायचे?' हा प्रश्न पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पडला आहे.

राज्य शासनाच्या गृह विभागाने पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकृष्ण कोकाटे यांच्या बदलीचे आदेश काढून त्यांच्या जागी डॉ. नीलाभ रोहन यांची नियुक्ती केली. त्यानुसार डॉ. रोहन यांनी २३ डिसेंबर रोजी हिंगोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. मात्र, या बदलीविरोधात डॉ. कोकाटे यांनी मुंबई येथील केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला. प्राधिकरणाने पुढील आदेश येईपर्यंत कार्यमुक्त करू नये, असा अंतरिम आदेश दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी ६ जानेवारी रोजी होणार आहे.

न्यायाधिकरणाच्या आदेशामुळे डॉ. कोकाटे हे अद्याप अधिकृतपणे कार्यमुक्त झालेले नाहीत, तसेच पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार हस्तांतरित झालेला नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, शासनाच्या आदेशानुसार नियुक्त झालेले डॉ. रोहन यांनी पदभार स्वीकारल्याने हिंगोलीत एकाच पदावर दोन पोलीस अधीक्षक अशी स्थिती निर्माण झाली आहे.

या प्रशासकीय पेचामुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संभ्रमात सापडले आहेत. दैनंदिन कामकाजात, नस्ती मंजुरीपासून ते आदेश अंमलबजावणीपर्यंत नेमके कुणाचे निर्देश अंतिम मानायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. न्यायालयीन आदेशाचा अवमान होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना डॉ. कोकाटे यांनी दिल्याची चर्चा असून त्यामुळे गोंधळ आणखी वाढला आहे. विशेष म्हणजे, डॉ. कोकाटे यांचा हिंगोलीतील कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आल्याने हा वाद अधिक चिघळला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.