Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर :- जिद्द असावी तर अशी! घर-संसार सांभाळत मिळवली 'खाकी वर्दी'; वयाच्या 40 व्या वर्षी आरती कणिरे बनल्या पोलिस उपनिरीक्षक!

कोल्हापूर :- जिद्द असावी तर अशी! घर-संसार सांभाळत मिळवली 'खाकी वर्दी'; वयाच्या 40 व्या वर्षी आरती कणिरे बनल्या पोलिस उपनिरीक्षक!


पट्टणकोडोली (कोल्हापूर) : मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य राहत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या इंगळी गावची कन्या आरती कणिरे शिक्षणात खंड, संसाराची जबाबदारी, वयाची अट आणि कोरोनासारखी संकटे पार करत आरती कणिरे यांनी वयाच्या ४० व्या वर्षी पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मान नुकताच मिळवला. ३८९ जणांच्या बॅचमधून सर्व फिजिकल परीक्षा देत ५८ वी रँक घेत इंगळी गावचे नाव राज्यात उज्वल केले. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आरती कणिरे यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले. आरती या गावातील पहिल्याच महिला पोलिस अधिकारी  झाल्या.

आरती कणिरे यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इंगळी येथे पूर्ण केले. १२ वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर लगेच लग्न करून देण्यात आलं. लग्नानंतर अनेक वर्षे शिक्षणापासून दूर राहिल्यानंतर पुन्हा शिक्षण घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दूर शिक्षण केंद्रातून वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण केली, त्यानंतर एमबीएचे शिक्षणही पूर्ण केले. याच काळात त्यांची मुलगा एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. "मुलगा डॉक्टर होण्यासाठी झटत असताना मी स्वतः पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत होते," असे आरती कणिरे यांनी सांगितले.

वयाच्या ३२ व्या वर्षी निवड

वयाच्या ३० व्या वर्षी पोलिस अधिकारी होण्याचा निर्धार त्यांनी केला. सुरुवातीला वयाची अट अडसर ठरली; मात्र ईडब्ल्यूएस कोट्यामुळे वयोमर्यादेत सवलत मिळाल्याने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी संधी मिळाली. वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांची निवड झाली. मात्र, कोरोनामुळे तब्बल पाच वर्षे प्रशिक्षण लांबले.

कोल्हापूर विभागासाठी नियुक्ती
अखेर वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी मुख्य परीक्षा पूर्ण केली आणि वयाच्या ४० व्या वर्षी नाशिक येथे पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षणासाठी रुजू झाल्या. ३८९ उमेदवारांच्या बॅचमध्ये त्यांनी ५८ वी रँक मिळवली, तर ६७ महिला उमेदवारांमध्ये १४ वी रँक पटकावली. कोल्हापूर विभागासाठी त्यांची नियुक्ती झाली असून २९ डिसेंबर रोजी त्यांना कार्यस्थळ मिळणार आहे.
पती सावलीसारखा राहिला सोबत

आरती कणिरे यांच्या या यशामागे त्यांच्या पतीचे भक्कम पाठबळ आहे. १२ वी नंतर शिक्षणापासून दूर गेल्यानंतर पुन्हा शिक्षण सुरू करण्यासाठी पतीनेच त्यांना प्रोत्साहन दिले. अभ्यासकाळात मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी पतीने सांभाळली. त्यामुळे आज मुलगी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करत आहे, तर मुलगा पदवीचे शिक्षण घेत आहे.

सासू-सासऱ्यांचे मोलाचे सहकार्य
आरती कणिरे यांचे माहेर व सासर दोन्ही इंगळी येथेच असल्याने कुटुंबाकडून मोठे सहकार्य लाभले. सुरुवातीला "घर-संसार आणि अभ्यास कसा जमणार?" असे प्रश्न उपस्थित झाले; मात्र कालांतराने सासू-सासऱ्यांनीही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. प्रशिक्षणासाठी नाशिकला असताना मुलांचा सांभाळ सासू-सासऱ्यांनी केल्याने त्यांच्या यशात त्यांचा मोठा वाटा असल्याचे आरती कणिरे यांनी नमूद केले. आरती कणिरे यांचा हा प्रवास ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.