'भारताच्या राजकारणात मोठी उलथापालथ', अमेरिका लैंगिक शोषण प्रकरणाबाबत पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट!
लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षात थोडा जास्त आत्मविश्वास आला. काही लोक तर मीच मुख्यमंत्री होणार असं म्हणू लागले होते. परिणामी आम्हाला धक्का बसला आणि निकाल आमच्या विरोधात लागला, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. यात त्यांनी निवडणूक आयोगावरदेखील निशाणा साधला. यात निवडणूक आयोगाच्या चुका सुद्धा आहेत. ते दुहेरी नावे का काढत नाहीत? असा प्रश्न त्यांनी विचारला. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
माझ्या कराड मतदारसंघातच 50 ते 60 हजार मतदारांची नावे दोनदा आहेत. इतकेच नव्हे, तर माझ्या मतदारसंघातील 12 हजार मतदारांची नावे चक्क 48 ठिकाणी दिसतात! यामुळे लोक अनेक ठिकाणी मतदान करतात. मला मागच्या वेळेपेक्षा जास्त मते मिळाली तरी मी हरलो. लाडकी बहीण असल्यामुळे निकाल बदलले असं आम्हाला वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरी सत्ताधारी एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असल्याचा दावा करतात. याची लाज वाटायला हवी. एका मराठी माणसाला पंतप्रधानपद मिळेल असं बोललो होतो आणि त्यावर स्पष्टीकरणही दिलंय. 19 डिसेंबरपर्यंत थांबा, काय घडतं ते पाहू, असे ते म्हणाले.
1998 मध्ये वाजपेयी सरकारने केलेली अणुचाचणी ही मोठी चूक होती. त्यामुळे पाकिस्ताननेही चाचणी करून स्वत:ला अणुशक्ती असलेला देश म्हणून घोषित केलं आणि तो आपल्या बरोबरीला आल्याचे ते म्हणाले. मोदी सरकारने सेमीकंडक्टर उद्योगाच्या नावाखाली पुन्हा लायसन्स राज आणलंय. महाराष्ट्रात मोठे उद्योग का येत नाहीत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारकडे विकासकामांसाठी पैसे नाहीत! फक्त कमिशनसाठी शक्तीपीठ मार्ग बांधण्याचा प्रयत्न चालू असल्याची टीका त्यांनी केली.अमेरिकेत जेफ्री एपस्टीन नावाचा उद्योगपती लैंगिक शोषण आणि ट्रॅफिकिंग करत असल्याचं उघड झालं. न्यायालयाने त्याला शिक्षा दिली, पण ट्रम्पचा जवळचा असल्यामुळे त्याचे गुन्हे लपवले जातील असं अमेरिकन लोकांना वाटत होतं. दरम्यान त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेत एपस्टीन फाइल्स पारदर्शकता कायदा पास झाला. या कायद्याने त्याच्या गुन्ह्यांची माहिती जगजाहीर होईल. 19 डिसेंबर 2025 रोजी मोठी नावे उघड होऊ शकतात, ज्यात काही मोठी भारतीय नावेही आहेत, असे ते म्हणाले. मी आज नाव घेणार नाही, पण यादीत तीन माजी खासदार आहेत. यामुळे भारताच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या वेळी ट्रम्पची मध्यस्थी मोदींना मान्य करावी लागली. याचा 19 डिसेंबरशी संबंध असू शकतो. अमेरिकेत बालके आणि युवक शोषणाला खूप गांभीर्याने घेतलं जातं, म्हणून असे कायदे होतात, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.