भाजपचा दणका; घराणेशाहीला 'ब्रेक'; आमदार, खासदारांच्या मुलांना, नातेवाइकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय
पुणे: पुणे महापालिकेसाठी भाजपच्या आमदार, खासदारांच्या मुलांना, जवळच्या नातेवाइकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपच्या नेतृत्वाने घेतला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना जोरदार झटका बसला आहे, तर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुजरात, दिल्ली पॅटर्नप्रमाणे पुण्यासह महाराष्ट्रात हा निर्णय लागू केला आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून १६५ जागांवर इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आलेले होते. त्यात २ हजार ३०० पेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज सादर केले होते. पक्षांमध्ये प्रचंड स्पर्धा असताना अन्य पक्षातील सुमारे १० माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे.त्यामुळे तेथील मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढविता येणार नाही, अशी स्थिती आहे. त्यातच शहरातील आमदार, खासदारांच्या नातेवाइकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डींग लावली होती. आमदारांनी त्यांच्या मुलांना उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार लॉबींग केले.हे नातेवाईक कोणत्या प्रभागातून लढणार, त्यांच्यासाठी कोणत्या माजी नगरसेवकाची उमेदवारी नाकारायचे, याचेसुद्धा नियोजन झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झालेल्या बैठकीतही मुलांची व नातेवाइकांच्या उमेदवारीवर चर्चा झाली होती. पण त्यावेळी उमेदवारी मिळणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नव्हती. पण या बैठकीत विरोध न झाल्याने 'खास' उमेदवारांचे तिकीट फिक्स असल्याचेच चित्र निर्माण झाले होते.
शनिवारी रात्री पक्षाच्या नेतृत्वाने हा आदेश पुण्यात कळविल्यानंतर एकच खळबळ उडाली. या आदेशाचा फटका अनेक वेळा निवडून आलेल्या माजी नगरसेवकांना बसला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची उमेदवारी कायम राहावी, यासाठी मुंबईत जाऊन गाठीभेटी घेतल्या.
पण त्यातून फारसे काही पदरी पडलेले नाही. या निर्णयामुळे कोथरूड, बिबवेवाडी, सातारा रस्ता, धनकवडी आदी भागातून तयारी करणाऱ्या उमेदवारांना बसला आहे. तर या ठिकाणी अनेक वर्ष काम करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान, राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या मुलीला उमेदवारी देण्याबाबत पक्षातील काही नेत्यांनी विचारणा केलेली होती. पण कुलकर्णी यांनी त्यास नकार कळवत त्यांच्या दोन कार्यकर्त्यांना प्रभाग २९ एरंडवणे हॅपी कॉलनीमधून उमेदवारी द्यावी, यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे. त्यावरून पक्षात बैठकीत वाद झाल्याचीही माहिती मिळत आहे.
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील अनेक माजी नगरसेवक इच्छुक होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल आमदारांमध्ये नाराजी होती. हे इच्छुक आता महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असताना त्यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी काही आमदारांनी दबाव आणला होता. पण त्याचाही परिणाम झालेला नाही. यातील अनेकांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
नगर परिषदेला फटका
नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या घरात उमेदवारी दिल्याने भाजपला फटका बसला होता. एकाच घरातील अनेक उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाने महापालिका निवडणुकीसाठी आमदार, खासदारांच्या मुलांना, नातेवाइकांना उमेदवारी द्यायची नाही, असा निर्णय घेतला आहे. यापूर्वी असे निर्णय गुजरात, दिल्ली महापालिकेतही घेतले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.