ना खाऊंगा, ना खाने दुंगा..! असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले. मागील ११ वर्षांत त्यांनी अनेकदा त्याचा पुनर्रच्चार केला. त्यांच्यासोबत भाजप व मित्रपक्षांचे नेतेही हाच नारा देताना दिसत होते. पण मोदींच्या मंत्रिमंडळातील एका केंद्रीय मंत्र्यांना मात्र ही घोषणा बदलली आहे. पक्षाच्या एका कार्यक्रमात त्यांनी थेट कमिशन घेण्याचा सल्लाच आमदारांना दिल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांच्या एका विधानामुळे मोठा वाद उद्भवला आहे. विरोधकांच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. मांझी यांचा 'हम' पक्ष एनडीएमध्ये आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांशी त्यांनी रविवारी संवाद साधत सत्कार केला. यावेळ बोलताना त्यांनी व्यासपीठावर कमिशनबाबत भाष्य केले आहे.
कार्यक्रमामध्ये मांझी यांचे पुत्र व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष सुमन हेही उपस्थित होते. त्यांनी आपल्या मुलाला पक्ष मजबूत करण्यासाठी सांगताना म्हटले की, प्रत्येक खासदार, आमदार कमिशन घेतात. कमी कमिशन मिळाले तरी चालेल. कुणी १० टक्के देत नसेल तर ५ टक्के घ्या. पाच टक्क्यांवरच काम चालवून घ्या. सांगण्याचा अर्थ असा आहे की, माझ्याकडे ताकद आणि आपण करू शकतो. केवळ मनाची तयारी हवी, असा आदेशवजा सल्ला मांझी यांनी दिला आहे.मांझी यांनी आपल्या मुलाला पक्ष मजबूत करण्यासाठी या कमिशनच्या पैशांचा वापर करावा, असे सांगितले. आपण स्वत: खासदार फंडाच्या कमिशनमधून पक्षाची मदत करू, असेही ते म्हणाले. मांझी यांच्या या विधानामुळे आता राजकारण तापले आहे. मांझी यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
दरम्यान, मांझी यांनी काही दिवसांपूर्वीच निवडणुकीबाबतही वादग्रस्त विधान केले होते. एका पराभूत होणाऱ्या आमदाराला आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगून विजयी केले होते. पण या निवडणुकीवेळी ते आपल्याकडे आलेच नाहीत, असे मांझी म्हणाले होते. त्यानंतर विरोधी पक्षांनी थेट भाजप आणि निवडणूक आयोगाला लक्ष केले होते. आता तर मांझी यांनी थेट कमिशनबाबत भाष्य करत भ्रष्टाचारालाच खतपाणी घालण्याचे काम केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.