तामिळनाडूतील चेन्नईजवळ घडलेल्या एका प्रकरणात 19 डिसेंबरला पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. विम्याचे पैसे मिळवण्यासाठी एका व्यक्तीच्या मानेला सर्पदंश घडवून त्यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली. या सहाजणांमध्ये मृत व्यक्तीच्या दोन मुलांचाही समावेश आहे. तिरुवल्लूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेकानंद शुक्ला म्हणतात की, या मृत्यूबद्दल विमा कंपनीनं संशय व्यक्त केल्यामुळे या प्रकरणातील सत्य समोर आलं. "वडिलांच्या नावावर असलेल्या विम्याची तीन कोटी रुपयांहून अधिकची रक्कम मिळवण्यासाठी या मुलांनी हे घृणास्पद कृत्य केलं," असं ते म्हणाले.
या प्रकरणात मुलांना अटक कशी झाली?
पोथट्टूरपेट्टई हे गाव, तिरुवल्लूर जिल्ह्यातील तिरुत्तनी तालुक्यापासून जवळपास 20 किमी अंतरावर आहे. 22 ऑक्टोबरला या गावातील 56 वर्षांचे रहिवासी, गणेशन यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. तिरुवल्लूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेकानंद शुक्ला म्हणाले की, गणेशन यांच्या मुलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोथट्टूरपेट पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणाची नोंद करण्यात आली.मृत गणेशन पोथट्टूरपेटमधील मुलींच्या सरकारी उच्च माध्यमिक शाळेत प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत होते. या प्रकरणात सुरुवातीच्या टप्प्यातील एका प्रसिद्धीपत्रकात पोलिसांनी, ही घटना सर्पदंशामुळे झालेला अपघाती मृत्यू असल्याचं दिसत असल्याचं म्हटलं होतं.
'चार विमा पॉलिसी, तीन कोटी रुपये'
गणेशन यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच, त्यांची पत्नी समुती आणि मुलांनी, गणेशन यांनी काढलेल्या विमा पॉलिसीची रक्कम मिळण्यासाठी खासगी विमा कंपनीकडे दावा सादर केला. "मृत गणेशन आणि त्यांच्या कुटुंबानं 11 विमा पॉलिसी घेतल्या होत्या. त्यातील चार विमा पॉलिसी गणेशन यांच्या नावावर आहेत," असं तिरुवल्लूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेकानंद शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
पोलीस अधीक्षक शुक्ला यांनी पुढे सांगितलं की, गणेशन यांनी तीन कोटी रुपयांहून अधिक रकमेचा विमा काढला होता. त्यात टर्म इन्शुरन्सचाही समावेश होता. ते पुढे म्हणाले, "विमा कंपनीनं हा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार उत्तर विभागाचे आयजी असरा गर्ग यांच्याकडे दाखल केली आहे." या प्रकरणात सखोल तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी 6 डिसेंबरला गुम्मिडीपुंडीच्या जिल्हा पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) जयश्री यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केलं आहे.
'अधिक कर्ज... अधिक विमा'
जिल्हा पोलिसांनी सांगितलं की, समितीच्या तपासातून आढळलं आहे की, गणेशन यांच्या कुटुंबानं मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं होतं. तसंच खूप मोठ्या रकमांच्या विमा पॉलिसी काढल्या होत्या. "एका सामान्य सरकारी कर्मचाऱ्यानं इतक्या कोटी रुपयांच्या विमा पॉलिसी कशा काढल्या असाव्यात यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत," असं जिल्हा पोलीस अधीक्षक विवेकानंद शुक्ला पत्रकार परिषदेत म्हणाले.जिल्हा पोलिसांनी असंही म्हटलं आहे की, "कुटुंबाच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांच्या तुलनेत त्यांनी घेतलेलं कर्ज आणि काढलेल्या मोठ्या रकमेच्या विमा पॉलिसी यामुळे मृत्यूच्या खऱ्या कारणाबद्दल गंभीर शंका निर्माण झाली आहे." गुम्मिडीपुंडीच्या पोलीस उपअधीक्षक जयश्री बीबीसीला म्हणाल्या की, "विमा कंपन्या विम्याची रक्कम अदा करण्यापूर्वी सहसा चौकशी करतात. त्यामुळेच या मृत्यूबद्दल संशय आहे."19 डिसेंबरला पत्रकारांशी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक विवेकानंद शुक्ला म्हणाले होते की, "गेल्या काही आठवड्यांपासून विशेष गुप्तचर पथक सातत्यानं तपास करतं आहे. त्यांनी गणेशन यांच्या कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांचे आणि विमा पॉलिसीचे सर्व तपशील गोळा केले आहेत."
'दोन धक्कादायक घटना'
पोलिसांनी पुष्टी केली आहे की मोहनराज आणि हरिकरण या गणेशन यांच्या मुलांनी विम्याचे पैसे मिळवण्यासाठी त्यांच्या वडिलांच्या हत्येचा कट आखला होता. "या कटाचा भाग म्हणून या दोघांनी बालाजी, प्रशांत, दिनकरन आणि नवीन कुमार यांच्याशी संपर्क साधला. मग त्यांनी त्यांच्या वडिलांची हत्या करण्यासाठी सापाची व्यवस्था केली. तसंच त्यांच्या वडिलांचा मृत्यू सर्पदंशानं झाल्याचं भासवलं," असं पोलिसांनी त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे.
जिल्हा पोलिसांनी सांगितलं आहे की, "गणेशन यांच्या मुलांनी त्यांची हत्या करण्यासाठी दोन घटना घडवून आणल्या. गणेशन यांच्या मृत्यूच्या आठवडाभरापूर्वी, त्यांनी दिनकरन नावाच्या व्यक्तीकडून एक विषारी साप (नाग) विकत घेतला. मग त्यांनी या सापाकडून गणेशन यांच्या पायाला दंश घडवून आणला."
वृत्तांमध्ये असंही म्हटलं आहे की, या प्रयत्नात गणेशन यांचा मृत्यू झाला नाही. मग त्यांच्या मुलांनी 22 ऑक्टोबरच्या पहाटे मण्यार साप (क्रेट स्नेक) घरात आणला. मग गणेशन झोपलेले असताना त्यांनी त्यांच्या मानेवर या सापाचा दंश घडवून आणला.
हॉस्पिटलमध्ये नेण्यास केला 'विलंब'
"या सहा आरोपींपैकी एकाकडे साप हाताळण्याचं कौशल्य आहे. गणेशन यांना ज्या सापानं दंश केला तो तीन फूट लांब होता. गणेशन यांना दंश केलेल्या सापाला त्यांनी जागेवरच मारून टाकलं," असं जिल्हा पोलीस अधीक्षक विवेकानंद शुक्ला म्हणाले.
"तपासातून असं समोर आलं की सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्यामध्ये विनाकारणच विलंब झाला होता. सुनियोजित गुन्ह्याचा हा एक महत्त्वाचा पुरावा आहे," असं पोलीस म्हणाले. "पहिल्यांदा जेव्हा गणेशन यांना सर्पदंश झाला होता, तेव्हा त्यांच्या पायाला जखम झाली होती. त्यावर त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले होते. त्यामुळे ते नीट जेवणही करू शकत नव्हते," असं गणेशन यांचे पुतणे गणपती म्हणाले.
पोथट्टूरपेट इथं राहणारे गणेशन आणि त्यांचे वडील हे भाऊ आहेत. ते म्हणाले, "जेव्हा ही घटना घडली, तेव्हा गणेशन घरातील तळमजल्यावर झोपले होते. ते म्हणाले की त्यांना मानेवर साप चावला आहे आणि त्यांना तिरुत्तनी सरकार हॉस्पिटलमध्ये नेलं आहे." "ज्या डॉक्टरांनी गणेशन यांची तपासणी केली, त्यांनी सांगितलं की सर्पदंशामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. मग तिथेच शवविच्छेदनदेखील करण्यात आलं," असं ते म्हणाले.
नातेवाईकांचं काय म्हणणं आहे?
गणपती म्हणतात की, 2018 मध्ये गणेशन यांनी त्यांच्या वडिलांची जमीन विकत घेतली होती आणि तिथे दोन मजली घर बांधलं होतं. ते पुढे म्हणाले, "त्यांच्या दोन मुलांपैकी एकजण चेन्नईत एका कंपनीत नोकरी करत होता. तर दुसरा मुलगा मेकॅनिक म्हणून काम करत होता."
गणपती म्हणाले की काही वर्षांपूर्वी गणेशन यांनी त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न लावून दिली होती. ते म्हणाले, "दोघांनाही अपत्यं आहेत. गावात या दोघांच्याही विरोधात कोणताही आरोप नाही. त्यांच्यावर इतकं मोठं कर्ज होतं, याची आम्हाला कल्पना नव्हती."गणपती यांनी असंही नमूद केलं की 19 डिसेंबरच्या पहाटे पोथट्टूरपेट पोलिसांनी या दोन्ही मुलांना अटक केल्यानंतरच त्यांना हे सर्व तपशील समजले. गणेशन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात हरिहरण, मोहनराज, प्रशांत, नवीनकुमार, बालाजी आणि दिनकरन यांना अटक करण्यात आली आहे."या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. अतिरिक्त पुरावे गोळा केले जात आहेत," असं जिल्हा पोलिसांनी सांगितलं. पोलिसांच्या प्रसिद्धपत्रकात म्हटलं आहे की, "विशेष तपास पथकानं केलेल्या वैज्ञानिक, तांत्रिक आणि प्रत्यक्षस्थळी केलेल्या तपासातून सर्पदंशामुळे मृत्यू झाला आहे असं वाटणाऱ्या या घटनेचं सत्य समोर आलं आहे."
पोलिसांनी असंही म्हटलं आहे की गणेशन पैसे मिळवण्यासाठी आखलेल्या गुन्हेगारी कटातून गणेशन यांची हत्या करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक जयश्री यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांच्यासाठी हे प्रकरण आव्हानात्मक होतं. त्या पुढे म्हणाल्या, "या प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का हे जाणून घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे."
(इशारा: या लेखातील काही माहिती विचलित करणारी असू शकते.)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.