परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अनेकजण उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी ब्रिटनची निवड करताना दिसतात. परंतु, अलीकडे हा कल कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तिथे असणारे भारतीयही आता ब्रिटन सोडण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत ब्रिटनमधून हजारोंच्या संख्येने भारतीय बाहेर पडले आहेत. ब्रिटनमधील ताज्या स्थलांतराच्या आकडेवारीवरून आश्चर्यकारक मंदी दिसून आली आहे. २०२५ मध्ये धोरणात्मक बदल, आर्थिक दबाव आणि बदलत्या कामगार बाजार परिस्थितीमुळे हे बदल झाले आहेत. भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी घट नोंदवल्याचे, ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या (ओएनएस) लोकसंख्या आणि जनगणनेच्या कार्यकारी संचालक मेरी ग्रेगरी यांनी म्हटले आहे. त्यामागील प्रमुख कारणे काय आहेत? याचा काय परिणाम होणार? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
७४ हजार भारतीयांनी सोडले ब्रिटन
ब्रिटन सोडून जाणाऱ्यांच्या यादीत भारतीय नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. ब्रिटन सोडणारे सुमारे ४५ हजार भारतीय नागरिक विद्यार्थी व्हिसावर, २२ हजार नागरिक कर्मचारी व्हिसावर, तर इतर सात हजार नागरिक ब्रिटनमध्ये होते, अशा एकूण ७४ हजार भारतीयांनी ब्रिटन सोडले. यानंतर ब्रिटन सोडणाऱ्या देशात चीनचा क्रमांक लागतो. चीनमधील ४२ हजार नागरिकांनी ब्रिटन सोडले. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स (ओएनएस) ने सांगितले की, “ब्रिटन सोडून जाणाऱ्या आणि युरोपीय नसलेल्यांमध्ये भारतीय नागरिक सर्वाधिक होते.”असे असले तरीही, ब्रिटनमध्ये येणाऱ्यांच्या यादीत भारतीय नागरिक अजूनही आघाडीवर आहेत. भारतीयांना सुमारे ९० हजार विद्यार्थी व्हिसा आणि ४६ हजार कर्मचारी व्हिसा मंजूर करण्यात आले आहे. ‘ओएनएस’ने पुढे सांगितले की, ब्रिटनमध्ये येणाऱ्या आणि युरोपियन नसलेल्या पहिल्या पाच देशांमध्ये भारतीय, पाकिस्तानी, चिनी आणि नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स (ओएनएस) ने नोंदवले की जूनपर्यंतच्या १२ महिन्यांत ब्रिटनमधून बाहेर पडलेल्या लोकांपेक्षा अंदाजे दोन लाख लोक ब्रिटनमध्ये आले. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा खूप कमी आहे. गृह मंत्रालयाच्या सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, व्हिसा मंजुरीच्या संख्येतदेखील २०२२ नंतरची सर्वात मोठी घट नोंदवण्यात आली आहे.
भारतीय एवढ्या मोठ्या संख्येने मायदेशी का परतत आहेत?
‘ओएनएस’ने मायदेशी परतण्याचे कारण विद्यार्थी व्हिसावर ब्रिटनमध्ये आलेले लोक असल्याचे म्हटले आहे. अहवालात नमूद केले आहे, “विद्यार्थी व्हिसावर मूळतः ब्रिटनमध्ये आलेल्या आणि युरोपियन नसलेल्या नागरिकांच्या स्थलांतरात वाढ झाली. प्रामुख्याने जून २०२५ मध्ये संपलेल्या वर्षात मोठ्या संख्येने भारतीय आणि चिनी नागरिक स्थलांतरित झाले.” विद्यार्थी आणि कुशल व्यावसायिकांच्या मायदेशी परतण्याचे सर्वात मोठे कारण ग्रॅज्युएट रूट हा व्हिसा आहे. या व्हिसाद्वारे विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण झाल्यावर दोन वर्षांसाठी ब्रिटनमध्ये राहण्याची परवानगी मिळते. ब्रिटन सरकारने २०२५-२६ पासून हा मार्ग अधिक कठोर करणार असल्याचे म्हटले आहे. हे बदल खालीलप्रमाणे असू शकतात:
व्हिसा कालावधी कमी करणे.
पात्रतेचे नियम अधिक कडक करणे.
विद्यापीठांसाठी कडक तपासणी नियम लागू करणे.
हे बदल ब्रिटनच्या भविष्यासाठी धोक्याचे असू शकतात, असा इशारा उद्योजकांनी दिला आहे. एका अहवालानुसार ९३ टक्के लंडनस्थित व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय प्रतिभेमुळे कौशल्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते, तर ८४ टक्के लोकांचा विश्वास आहे की परदेशी विद्यार्थ्यांना अभ्यासानंतर काम करण्याचा मार्ग मिळणे आवश्यक आहे.
कर्मचारी व्हिसा नियम अधिक कडक
‘Restoring Control Over the Immigration System’ नावाच्या २०२५ च्या स्थलांतर पत्रिकेमुळे कुशल स्थलांतराचा आधार बदलत आहे. काही प्रमुख बदल खालीलप्रमाणे आहेत:पात्र व्यवसायांची यादी कमी करणेसोशल केअर कर्मचाऱ्यांसाठी परदेशातील भरती थांबवणेजानेवारी २०२६ पासून इंग्रजी भाषेची आवश्यकता B1 वरून B2 पर्यंत वाढवणेस्थायी निवास मिळवण्यासाठी आवश्यक असलेला कालावधी पाच वर्षांवरून १० वर्षांपर्यंत वाढवणे, तसेच उत्पन्नाची मर्यादा अधिक कडक करणेयापैकी काही बदल आधीच लागू झाले आहेत; इतर २०२६ आणि २०२७ मध्ये लागू होतील. हाऊस ऑफ कॉमन्स लायब्ररी, यूके पार्लमेंटच्या अहवालात इशारा दिला आहे की, “जुलै २०२५ मध्ये कुशल कामगार पात्रता यादीतून जे क्षेत्र वगळण्यात आले आहे, त्यांच्यासाठी तो पर्याय आता उपलब्ध नाही. याचा परिणाम वाहतूक, दंतचिकित्सा आणि तुरुंग यांसारख्या क्षेत्रांमधील ग्रॅज्युएट व्हिसा धारकांवर झाला आहे.” कामगार देशातून परत जाण्यामागील हे एक मुख्य कारण आहे.
राहणीमानाचा खर्च आणि वाढता दबाव
तसेच स्थलांतरितांना महागाई आणि मूलभूत राहणीमानाचा खर्च व्यवस्थापित करणे कठीण झाले आहे. ब्रिटनचा महागाई दर ३.६ टक्के आहे. ‘ओएनएस’नुसार, ऑक्टोबर २०२५ पर्यंतच्या वर्षात अन्नधान्याच्या किमती ४.९ टक्क्यांनी वाढल्या आहेत, ज्यामुळे महागाई अधिक वाढली आहे. ऑक्टोबर २०२२ च्या उच्चांकानंतर महागाई लक्षणीयरीत्या कमी झाली असली तरी याचा अर्थ किमती कमी होत आहेत असा होत नाही. कोविड महामारीनंतर तेल आणि वायूची मागणी वाढल्याने २०२२ मध्ये महागाई वाढली आणि रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यावर ऊर्जेच्या किमती पुन्हा वाढल्या.
ब्रिटनमधील व्यावसायिकांनी व्यक्त केली चिंता
एकीकडे सरकार धोरणे कडक आहेत, तर दुसरीकडे व्यावसायिक चिंता व्यक्त करत आहेत. लंडनच्या आर्थिक लॉबी गटांनी तंत्रज्ञान, वित्त, आरोग्यसेवा, अध्यापन आणि संशोधन या क्षेत्रांमध्ये कामगार तुटवडा कायम असल्याचे सांगितले आहे. अभ्यासानंतरच्या व्हिसाचे प्रमाण कमी केल्यास स्पर्धात्मकता कमकुवत होईल आणि ब्रिटनची विद्यापीठे जागतिक आकर्षण राहणार नाहीत, असाही इशारा त्यांनी दिला आहे.“स्थलांतर कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा आर्थिक विकासावर नकारात्मक परिणाम होत आहे,” असे द वर्क राइट्स सेंटरमधील डॉ. डोरा ऑलिव्हिया विकोल यांनी सांगितले. ब्रिटनच्या गृह सचिव शबाना महमूद यांनी या नियंत्रणांचे समर्थन केले आणि सांगितले, “या सरकारच्या काळात निव्वळ स्थलांतर दोन तृतीयांशपेक्षा अधिक कमी झाले आहे. स्थलांतराचा वेग आणि प्रमाण यामुळे स्थानिक समुदायांवर प्रचंड दबाव आला होता.” तरीही, अनेक क्षेत्रे अजूनही युरोपिय नसलेल्या कामगारांवर, विशेषत: भारतीयांवर अवलंबून आहेत. मुख्य म्हणजे ते ब्रिटनच्या शिक्षण, तंत्रज्ञान कर्मचारी आणि आरोग्यसेवा क्षेत्राचा महत्त्वपूर्ण भाग आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.