सांगली दिं.२६: सांगली महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नव्या-जुन्यांचा जोरदार वाद उफाळून आला आहे. आमदार सुधीर गाडगीळ हे अनेक आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे जयश्रीताई पाटील आपल्या गटातील माजी नगरसेवकांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. यावरून आमदार गाडगीळ व जयश्रीताई पाटील यांच्यात चांगलेच बिनसले आहे. जयश्रीताई पाटील यांनी भाजपला दोन दिवसांचा अल्टिमेट दिल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे निवडणुकीपूर्वी भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सांगली महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी म्हणजे सहा महिन्यांपूर्वी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महापालिका क्षेत्रात स्व. मदनभाऊ पाटील यांचा गट मोठा आहे. त्यामुळे भाजपला या प्रवेशाचा फायदा होईल, या हेतूने हा प्रवेश घेतला होता. जयश्रीताई पाटील यांच्या सोबत त्यांच्या पक्षाचे माजी नगरसेवक भाजपमध्ये आले होते. महापालिकेच्या निवडणुकीत इतर पक्षातून आलेल्या २०१८ मधील नगरसेवकांना उमेदवारी मिळेल, अशी ग्वाही भाजपाचे चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली होती. त्यामुळे जयश्रीताई पाटील गटाचे माजी नगरसेवक बिनधास्त होते. या काळातच आमदार सुधीर गाडगीळ यांनी पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून लेटरबॉम्ब टाकला आणि भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची बाजू घेतली होती.
तो अद्याप धुमसत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रभाग क्रमांक एकमधून विश्वजीत पाटील, नऊमधून अतुल माने, अकरामधून सुजित काटे तर सोळामधून सुजित राऊत यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला. मात्र या ठिकाणी जयश्रीताई पाटील यांचे समर्थक व माजी नगरसेवकांनी उमेदवारी मागणी केली आहे. प्रभाग एकमधून माजी उपमहापौर प्रशांत पाटील, नऊमधून स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, अकरामधून माजी महापौर कांचन कांबळे यांचे दीर संजय कांबळे, तर सोळामधून माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. हे तगडे उमेदवार आहेत.
मात्र जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये आणि झाला तर अन्याय सहन केला जाणार नाही. माझ्या समर्थकांना उमेदवारी हवीच, अशी भूमीका आमदार सुधीर गाडगीळ यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे जयश्रीताई पाटील यांनी देखील या चौघांच्या उमेदवारीबाबतीत कोणतीही तडजोड मान्य करणार नाही, अशी भूमीका घेत पक्षाला दोन दिवसांचा अल्टिमेट दिला आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अयपश आले. हा वाद आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे. पण यामुळे जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा वाद उफाळून आला आहे. जयश्रीताई पाटील या पुन्हा घरवापसी करण्याच्या मनस्थितीत आहेत.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक प्रभागात हा वाद दिसून येणार आहे. अगोरदच भाजपकडे पाचशेहून अधिक इच्छूक आहेत. त्यामध्ये जुन्या-नव्यांचा वाद झाला तर बंडखोरीची शक्यता आहे. अशातच भाजपच्या नेत्यांची अडचण होऊ शकतो. पूर्वी भाजपला सोपी असणारी निवडणूक आता अवघड होत चालली आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आता आमदार सुधीर गाडगीळ व जयश्रीताई पाटील यांच्याबरोबर जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा वाद येत्या चार दिवसात संपवावा लागणार आहे. अन्यथा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रभागात सुरू आहे उमेदवारीवरून वाद...
.प्रभाग क्र. 1- प्रशांत पाटील (जयश्रीताई समर्थक) व विश्वजीत पाटील (गाडगीळ समर्थक). प्रभाग क्र. 9- संतोष पाटील (जयश्रीताई समर्थक) व अतुल माने (गाडगीळ समर्थक). प्रभाग क्र. 16- उत्तम साखळकर (जयश्रीताई समर्थक) व सुजीत राऊत (गाडगीळ समर्थक). प्रभाग क्र. 11- संजय कांबळे (जयश्रीताई समर्थक) व सुजीत काटे (गाडगीळ समर्थक)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.