'पक्षाने माझी ताकद कमी केली', भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांचा गंभीर आरोप, CM फडणवीसांनी सुनावलं 'तुम्हाला...'
कुठल्याही निवडणुकीचे निकाल लागले की विजयाचं श्रेय घ्यायला नेत्यांची धडपड असते. आणि कुठे पराभव झाला की त्याची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न असतो. आता भाजपचा राज्यभरात विजय झालाय पण एका जिल्ह्यात झालेल्या पराभवावरुन थेट भाजपमधल्या इन्कमिंगलाच एका नेत्याने पराभवासाठी जबाबदार धरलंय. इतकंच काय तर पक्षाने माझी ताकद कमी केली असं म्हणत पराभवासाठी पक्षाकडे बोट दाखवलंय. दरम्यान यानंतर भाजपात चांगलीच जुंपली आहे.
नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले. त्यात चंद्रपूर जिल्ह्यात भाजपची पिछेहाट झाली आणि मुनगटीवारांच्या मनातली खदखद बाहेर आली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या 11 पैकी 8 जागांवर काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले. त्यामुळे राज्यभरात विजयाची पताका फडकवणाऱ्या भाजपला इथे मात्र मोठा फटका बसला. त्यानंतर या पराभवाच खापर मुनगंटीवारांनी पक्षनेतृत्वावर फोडत पक्षाला घरचा आहेर दिला. यावरुन विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली.
मुख्यमंत्र्यांनी मात्र पक्षप्रवेशावरुन पक्षाची ताकद वाढल्याचं मुनगंटीवारांना सुनावलं आहे. तसंच महापालिका निवडणुकांमध्ये ताकद देऊ असं म्हटलं आहे. यावरुन ताकद नसतानाही मी काम करतो असं थेट उत्तर मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.पराभवाला जबाबदार धऱताना मुनगंटीवारांचा रोख होता आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे होता. कारण मुनगंटीवारांचा विरोध डावलून त्यांना पक्षात घेण्यात आलं होतं. त्यामुळे मुनगंटीवारांचं हे वक्तव्य म्हणजे कार्यकर्त्यांचा अपमान असल्याचं जोरगेवारांनी म्हटलं आहे. आधीच मंत्रीमंडळात डावलल्यामुळे मुनगंटीवार नाराज आहेत. मुनगंटीवारांच्या याच जखमेवर मंत्री गिरिश महाजनांनी मिठ चोळलं आहे. मंत्रीपद असतं तर जिंकलो असतो का? असं त्यांनी विचारलं.
महापालिका निवडणुका झाल्यानंतर राज्यभरात कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भेट घेणार असल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलं आहे. मुनगंटीवार मनात आले ते फटकन बोलून जातात. सत्ताधारी पक्षात असूनही सरकारला एखाद्या मुद्द्यावरुन धारेवर धरायला सुद्धा ते मागे पुढे बघत नाही. आपल्या मनातली खदखद त्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने बोलून दाखवली आहे. आता मुख्यमंत्री म्हटले त्याप्रमाणे महापालिका निवडणुकांमध्ये मुनगंटीवारांना अपेक्षित ताकद दिली जाते का आणि मुनगंटीवार त्याचं चीज करतात का हे बघणं औत्सुक्याचं असेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.