सांगली : जतच्या यात्रेवेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीला शेकण्यासाठी आलेल्या अनोळखीचा खून केवळ दारूच्या कारणावरून केल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी दोन संशयितांना सोमवारी अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी दिली.
जतची यल्लमा यात्रा सुरू असताना दि. १९ डिसेंबर रोजी दोन तरूण शेकोटीजवळ शेकत बसले होते. या दरम्यान, एक अनोळखी व्यक्ती शेकण्यासाठी आली असता त्या दोघांनी पिण्यासाठी दारू मागितली. त्यानेही देण्याची तयारी दर्शवली. दुचाकीवरून दारूच्या दुकानाजवळ आल्यानंतर अनोळखी व्यक्तीने माझ्याकडे दारूसाठी पैसे नसल्याची सबब सांगितली. या कारणावरून एकाने त्याला थोबाडीत मारली. यामुळे चिडून त्यांने शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून त्या अनोळखी व्यक्तीला त्यांनी दुचाकीवरून जत बाजार समितीच्या आवारात नेले. त्या ठिकाणी त्याला निर्वस्त्र करून लाकडी दांडक्याने मारले. त्यात त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीचा बेवारस मृतदेह आढळून आल्याची नोंद करून तपास केला असता अनोळखी व्यक्तीचे नाव विकास मलकारी टकले (वय २२ रा. टकले वस्ती, उमदी) असल्याचे स्पष्ट झाले. पोलीसांनी बाजार समितीच्या कॅमेर्यातील चित्रीकरणावरून दोन तरूणांच्या संशयास्पद हालचाली आढळल्या. तांत्रिक तपासाच्या आधारे या खूनप्रकरणी रविंद्र बंडगर (वय ३०) व विराज पांढरे (वय २० दोघेही रा. शिवाजी पेठ. जत) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक माहिती देताना निरीक्षक झाडे यांनी सांगितले, या खूनामागे निश्चित असे कोणतेच कारण नव्हते. केवळ शेकोटीला आलेल्या तरूणाची मस्करी करायची या हेतूने त्याला नग्न करून छेडछाड करण्यात आली. यामुळे शिवीगाळ केल्याने त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. यातच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, त्याचा गावातील चुलत भावासोबत २७ गुंठे जमिनीबाबत वाद होता. त्याला मारल्याचे समजताच, त्या भावाने मोठेपणाने आपणच त्याला खलास केल्याचे बहिणीला सांगितले. यामुळे पोलीसांना प्रथम त्याचा संशय आला. दोन दिवस त्याला न केलेल्या कृत्याबद्दल पण मोठेपणा मिरवण्यासाठी केलेल्या वक्तव्याबद्दल पोलीसांचा पाहुणाचार मात्र सहन करावा लागला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.