मालेगावचा धक्कादायक निकाल! 'इस्लाम'ने जिंकल्या सर्वाधिक 35 जागा; एमआयएम दुसऱ्या, शिवसेना तिसऱ्या स्थानी, BJP ची धूळधाण
मालेगाव : येथील महानगरपालिकेच्या २१ प्रभागातील ८४ जागांचे निकाल शुक्रवारी (ता. १६) जाहीर करण्यात आले. अवघ्या तीन तासात सर्व निकाल हाती आल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी आतषबाजी करत गुलालाची उधळण केली.
कॅम्प रस्त्यावर जागोजागी जल्लोषाचे वातावरण होते. निवडणुकीत शिक्षणमंत्री दादा भुसे यांची शिवसेना व माजी आमदार आसिफ शेख यांचा इस्लाम पक्ष यांचीच हवा दिसून आली. भाजपने दाखविलेले भाजपचाच महापौर होण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले. या पक्षाचा राज्यभर प्रभाव राहिलेला असताना शहरात केवळ दोनच जागा मिळाल्या. इस्लाम पक्षाने सर्वाधिक ३५, एमआयएमने २१ तर शिवसेनेने १८ जागांवर यश मिळविले आहे. समाजवादी पक्षाला ६, भाजपला २ तर कॉंग्रेसने तीन जागांवर विजय मिळविला आहे.
मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडल्याने प्रशासनासह पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. निकालानंतर पूर्व - पश्चिम अशा दोन्ही भागात काही मातब्बर नेते पराभूत झाल्याने नाराजीची किनारही दिसून आली. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कॅम्प रस्त्यावरील धान्य गोदाम, आयएमए हॉल व शिवाजी जिमखाना तसेच मोतीबाग नाक्यावरील कृष्णा लॉन्समध्ये सकाळी दहाला मतमोजणीला सुरुवात झाली. सुरवातीच्या पंधरा ते वीस मिनिटात टपाली मते मोजून झाल्यानंतर पाऊणेअकराच्या सुमारास पहिला कल बाहेर आला.सर्व २१ प्रभागातील मतमोजणी एकाच वेळी सुरु करण्यात आली होती. एका प्रभागासाठी चार टेबल लावण्यात आले होते. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे १२ टेबलांवर तीन प्रभागांची मतमोजणी करण्यात आली. दुपारी बारापर्यंत विजयाचे चित्र स्पष्ट होत गेल्याने मतमोजणी केंद्राबाहेर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण सुरु झाली.कॅम्प- संगमेश्वरच्या पश्चिम भागात प्रभाग क्रमांक एकमध्ये शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी सुरवातीपासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम होती. प्रभाग ९ मध्ये देखील शिवसेनेचे चारही उमेदवार सुरुवातीपासून विजयाकडे मार्गक्रमण करीत होते. प्रभाग १० मधील हायहोल्टेज लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. प्रभागातील पहिल्या तीन जागांवर शिवसेना उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली होती.
'ड' जागेवर भाजप नेते व उमेदवार सुनील गायकवाड, शिवसेनेचे विशाल पवार व भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार नितीन पोफळे यांच्यात लढत होती. सुरवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये गायकवाड यांनी आघाडी घेतली. तिसऱ्या फेरीपासून शिवसेनेचे पवार यांनी आघाडी घेत अखेरपर्यंत ती कायम ठेवली. प्रभाग १२ 'ड' मधील भाजपचे मदन गायकवाड व शिवसेनेचे विनोद वाघ यांची लढतही चर्चेत होती. गायकवाड यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत विजय खेचून आणला.
मौलाना मुफ्तींचे स्वप्न धुळीस
पश्चिम भागातील १६ प्रभागांमध्ये इस्लाम पक्ष व एमआयएम यांच्यात काट्याची लढत झाली. इस्लाम पक्षाने नेत्रदीपक यश मिळवत मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचे महापालिकेतील सत्तेचे स्वप्न धुळीस मिळविले. शुक्रवार सुटीचा दिवस असल्याने दोन्ही पक्षाचे हजारो समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर मोठी गर्दी केली होती. कॅम्प रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. मतमोजणीमुळे शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणीनंतरही काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त कायम होता.
सासू विजयी, जावई पराभूत
शिवसेनेने येथील प्रभाग क्रमांक ९ मधून लता घोडके यांना तर प्रभाग क्रमांक १२ मधून विनोद वाघ यांना उमेदवारी दिली होती. नात्याने ते सासू - जावई आहेत. लता घोडके विजयी झाल्या तर विनोद वाघ पराभूत झाले.
पती- पत्नी विजयी
निवडणुकीत कॉंग्रेसचे महानगरप्रमुख एजाज बेग व त्यांच्या पत्नी यास्मीन बानो प्रभाग क्रमांक १८ मधून विजयी झाले. समाजवादी पक्षाच्या नेत्या शानेहिंद निहाल अहमद प्रभाग ३ मधून तर त्यांचे पती मुश्तकीम डिग्निटी प्रभाग ७ मधून निवडून आले. मुश्तकीम डिग्निटी अवघ्या ३० मतांनी विजयी झाले. इस्लाम पक्षाचे माजी आमदार आसिफ शेख यांचे बंधू मोहम्मद खालिद हे प्रभाग १७ मधून तर त्यांच्या पत्नी शेख नसरीन खालिद हाजी या प्रभाग २० मधून विजयी झाल्या. दुसरीकडे एमआयएमचे माजी नगरसेवक अब्दुल माजीद युनूस ईसा व त्यांच्या पत्नी बुशरा अब्दुल माजीद या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
पिता - पुत्र पराभूत
भाजप नेते सुनील गायकवाड प्रभाग १० मधून तर त्यांचे पुत्र दीपक गायकवाड प्रभाग ११ मधून निवडणूक लढवीत होते. दोघा पिता - पुत्रांना पराभवाचा सामना करावा लागला. गायकवाड यांचे बंधू मदन गायकवाड यांनी मात्र प्रभाग १२ मधून विजय मिळविला.
प्रमुख पराभूत उमेदवार
माजी नगरसेवक गुलाब पगारेभाजपचे नेते सुनील गायकवाडभाजप महानगरप्रमुख देवा पाटीलमाजी नगरसेविका दीपाली वारुळेशिवसेना महानगरप्रमुख विनोद वाघमाजी नगरसेवक विजय देवरेमाजी नगरसेविका छाया शिंदेमाजी नगरसेवक माजीद हाजीशिवसेनेचे दिलीप बच्छावमाजी नगरसेवक बाळासाहेब आहिरेप्रमुख विजयी उमेदवारमाजी महापौर ताहेरा शेखमाजी महापौर अब्दुल मलिकशिवसेनेचे माजी उपमहापौर नीलेश आहेरमाजी उपमहापौर नरेंद्र सोनवणेमाजी नगरसेवक मदन गायकवाडसमाजवादी पक्षाच्या नेत्या शानेहिंद निहाल अहमदसमाजवादी पक्षाचे नेते मुश्तकीम डिग्निटीकॉंग्रेसचे महानगरप्रमुख एजाज बेगमाजी नगरसेवक नीलेश काकडेस्थायीचे माजी सभापती अस्लम अन्सारीमाजी नगरसेविका आशाताई आहिरे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.