सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी महापालिकेच्या निवडणुकीत यश संपादन करून राजकीय प्रवेश केला. ते वसंतदादा पाटील यांचे नातू, खासदार विशाल पाटील यांचे पुतणे असून त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत भाजपचे मनोज सरगर यांचा पराभव केला.
माजी केंद्रिंय मंत्री प्रतिक पाटील यांचे पुत्र असलेले हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी राजकीय क्षेत्रात पदार्पणातील पहिलीच निवडणूक असल्याने या निकालाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी सरगर यांचा मोठ्या मताधिक्यानी पराभव करून महापालिकेत प्रवेश केला आहे.
या निवडणुकीत मिरजेतील प्रभाग पाचमधून काँग्रेसचे संजय मेंढे आणि बबिता मेंढे हे पती पत्नी विजयी झाले आहेत. नवीन सभागृहात मेंढे दांपत्यासोबतच आवटी बंधूही असतील. याचबरोबर धीरज सुर्यवंशी आणि चेतन सुर्यवंशी हे भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांचे पुत्र अतहर नायकवडी हे दुसर्यांदा महापालिकेच्या सभागृहात दाखल होत आहेत.काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती. या आघाडीचा लाभ काँग्रेसला जसा झाला तसा लाभ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला झाला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महाविकास आघाडीशी काही प्रभागात तडजोड करत चांगले यश संपादन केले. काही प्रभागात आघाडीसोबत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रयोग झाला.
मात्र याचा फायदा भाजपला झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रभाग तीन मध्ये शिवसेना शिंदे गटाशी एका जागेसाठी आघाडी केल्याचा फायदा शिवसेनेला झाला. यामुळे सागर वनखंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. मात्र, त्यांच्या मातोश्री आणि माजी नगरसेविका अनिता वनखंडे यांचा प्रभाग दोनमध्ये पराभव झाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.