मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील मुलाखतीत एकनाथ शिंदे यांना आम्हाला नाराज करायचे नाही, ते नाराज झाले तर मग आम्ही मित्रपक्ष कसले? असे म्हणत एकनाथ शिंदे भाजपसाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मात्र या वक्तव्याला 24 तासही उलटत नाही तोच मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती असताना दोस्तीत कुस्ती सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे (शिंदे) कार्यकर्ते आमनेसामने आले, यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी माईकवरुन '50 खोके एकदम ओके' घोषणा देण्यात सुरुवात केली. या वॉर्डात दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. मात्र या घोषणाबाजीमुळे दोस्तीत कुस्ती सुरु असल्याचे चित्र समोर आले.
शिवसेना (शिंदे) आणि भाजप यांच्यात छत्रपती संभाजीनगर, पुणे येथे युती तुटली आहे. यामुळे येथील दोन्ही पक्षांचे मंत्री आमदार, खासदार एकमेकांवर जहरी टीका करत आहेत. तर मुंबई आणि ठाण्यामध्ये भाजप, शिवसेनेत (शिंदे) युती झाली. मात्र ही युती किती मनापासून आहे, असा सवाल निर्माण होत आहे. मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 173 येथे भाजपच्या शिल्पा केळुस्कर यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेच्या पूजा कांबळे यांच्यात लढत होत आहे. शुक्रवारी या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी माईकवरुन 50 खोके एकदम ओके अशी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. अशा घोषणा आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते देत आले आहेत. आता सत्तेत आणि मुंबई महापालिकेत युतीत असलेल्या सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देऊन शिंदेंच्या शिवसैनिकांना डिवचले. या घोषणाबाजीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात मुंबई, ठाण्यात युती झाली आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 युतीमध्ये शिवसेनेला (शिंदे) सुटला. एकनाथ शिंदेंनी येथून पूजा कांबळे यांना उमेदवारी दिली. मात्र भाजपच्या शिल्पा केळुस्कर यांनी भाजपच्या एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. त्यामुळे या वॉर्डात शिवसेना (शिंदे) विरुद्ध भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. मात्र आता प्रचारात या मैत्रीपूर्ण लढतीचे चित्र समोर आले, दोस्तीत कुस्ती सुरु असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.या घोषणाबाजीवर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी संतत्प प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, भाजपचे हे कोण महारथी आहेत, त्यांना पाहावे लागेल. या घोषणा देण्यापूर्वी त्यांनी फडणवीसांना एकदा विचारले पाहिजे. आमच्यामुळे तुम्ही (भाजप) सत्तेत आहे, याचा विसर पडू देऊ नका. या घोषणा देणाऱ्यांची दखल मुख्यमंत्री फडणवीस घेतली, असेही ते म्हणाले. दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.