कानपूरमध्ये कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर लगाम घालण्यासाठी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. क्राइम ब्रँचच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धनकुट्टी परिसरातील दाट वस्तीतील एका घरावर छापा टाकत हवाला व बेकायदेशीर चलन व्यवहारांशी संबंधित मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २ कोटी रुपयांची रोकड आणि ६१ किलो चांदी जप्त केली असून, या चांदीची बाजारातील किंमतही सुमारे २ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय नेपाळी चलन देखील जप्त करण्यात आले असून, या रॅकेटचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आतापर्यंत चार जणांना अटक
या छापेमारीदरम्यान पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे घर एका गुप्ता नावाच्या व्यक्तीचे असल्याचे सांगितले जात असून, याच ठिकाणी बेकायदेशीर व्यवहार सुरू होते. कारवाईची माहिती मिळताच पोलिस आयुक्त रघुवीर लाल आणि सहआयुक्त विनोद कुमार यांनीही घटनास्थळी भेट देत संपूर्ण ऑपरेशनवर नजर ठेवून होते.वरिष्ठ पोलीस अधिकारी सुमित सुधाकर रामटेके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. ते म्हणाले आम्ही या घरावर छापा टाकून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून सुमारे २ कोटी रुपये रोख, ६१ किलो चांदी आणि नेपाळी चलन जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हे एक मोठे रॅकेट असल्याचे समोर आले असून, यात आणखी काही लोक सहभागी असण्याची शक्यता आहे. आरोपींची सखोल चौकशी सुरू असून, त्यांच्या आकाचा शोध घेतला जात आहे.
नेपाळपर्यंत नेटवर्क पसरल्याची शक्यता
कानपूरमधील हवाला आणि बेकायदा आर्थिक व्यवहार करणाऱ्या रॅकेटचं कंबरडं मोडण्यासाठी केलेली कारवाई असल्याचे दिसून येते. हे रॅकेट केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेलाच नुकसान पोहोचवत नाहीत, तर दहशतवाद, तस्करी आणि इतर गुन्हेगारी कारवायांना आर्थिक रसद पुरवतात. नेपाळी चलनाच्या जप्तीमुळे हे नेटवर्क नेपाळपर्यंत पसरले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
बँक खाती, मोबाईल डेटा आणि मालमत्तांची चौकशी सुरू
पोलिस आता आरोपींची बँक खाती, मोबाईल डेटा, मालमत्ताची यांची सखोल तपासणी करत आहेत. या कारवाईमुळे कानपूरमधील नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, येत्या काळात आणखी छापेमाऱ्या होण्याची शक्यता असून, अशा रॅकेट्सना मुळासकट उखडून टाकण्यासाठी पोलिस कटिबद्ध आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.