Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जनगणनेत विचारले जाणार 'हे' ३३ प्रश्न! पाणी, गॅस, इंटरनेटपासून कुटुंबप्रमुखाच्या लिंगापर्यंत सर्वकाही; वाचा प्रश्नांची यादी

जनगणनेत विचारले जाणार 'हे' ३३ प्रश्न! पाणी, गॅस, इंटरनेटपासून कुटुंबप्रमुखाच्या लिंगापर्यंत सर्वकाही; वाचा प्रश्नांची यादी


२०११ नंतर होत असलेल्या जनगणनेच्या प्रक्रियेने आता वेग घेतल्याचे दिसत आहे. गुरुवारी (२२ जानेवारी २०२६) भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांनी महत्त्वाची अधिसूचना काढली. या अधिसूचनेमध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या ३३ प्रश्नांची यादी देण्यात आली आहे. हा जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान पार पडणार आहे.

गुरुवारी जारी केलेल्या राजपत्रीत अधिसूचनेत ३३ प्रश्नांची रूपरेषा मांडण्यात आली आहे. ज्यामध्ये घरातील फरशी आणि छतासाठी वापरलेले साहित्य, विवाहित जोडप्यांची संख्या, धान्याचा वापर, कुटुंबाच्या प्रमुखाचे लिंग, वाहनांची मालकी, जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि इतर घटकांचा समावेश आहे. या सर्व घटकांची माहिती परिपत्रकात देण्यात आली आहे. यापूर्वी २०२० मध्येही जनगणनेसाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची अधिसूचना जारी करण्यात आली होती. करोना महामारीमुळे २०२१ सालची जनगणना पुढे ढकलण्यात आली होती. त्यावेळी त्यात ३१ प्रश्नांचा समावेश होता. आता यामध्ये दोन प्रश्नांची भर पडली आहे.

पहिली डिजिटल जनगणना

या जनगणनेतील लोकसंख्या मोजणीच्या टप्प्यात जातीची माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदवली जाईल, असे सरकारने यापूर्वी सांगितले होते. विशेष म्हणजे सुमारे ३० लाख जणांकडून संपूर्ण देशाची लोकसंख्या मोजली जाणार आहे. ही देशातील पहिलीच 'डिजिटल जनगणना' असणार आहे.

जनगणनेत कोणते प्रश्न विचारले जाणार?
खाली दिलेल्या घटकांवर प्रश्न विचारले जाणार आहेत. जनगणनेच्या अर्जात एकूण ३३ प्रश्न असणार आहेत. या जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल ते ३० सप्टेंबरदरम्यान होणार आहे.

१. इमारत क्रमांक (नगरपालिका किंवा स्थानिक प्राधिकरणाचा किंवा जनगणना क्रमांक)
२. घर क्रमांक
३ घराच्या फरशीचे प्रमुख साहित्य
४. घराच्या भींतीचे प्रमुख साहित्य
५. घराच्या छताचे प्रमुख साहित्य
६. घराचा वापर
७. घराची स्थिती
८. कुटुंब क्रमांक
९. कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या
१०. कुटुंबप्रमुखाचे नाव
११. कुटुंबप्रमुखाचे लिंग
१२. कुटुंबप्रमुख अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर प्रवर्गातील आहे का
१३. मालकीची स्थिती
१४. कुटुंबाच्या विशेष ताब्यात असलेल्या राहण्याच्या खोल्यांची संख्या
१५. कुटुंबामध्ये राहणाऱ्या विवाहित जोडप्यांची संख्या
१६. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत
१७. पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची उपलब्धता
१८. वीजेचा मुख्य स्रोत
१९. शौचालयाची उपलब्धता
२०. शौचालयाचा प्रकार
२१. सांडपाणी निचरा
२२. स्नानगृहाची उपलब्धता
२३. स्वयंपाकघर आणि एलपीजी/पीएनजी कनेक्शनची उपलब्धता
२४. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन
२५. रेडिओ/ट्रान्झिस्टर
२६. टीव्ही
२७. इंटरनेटची उपलब्धता
२८. लॅपटॉप/संगणक
२९. टेलिफोन/मोबाइल फोन/स्मार्टफोन
३०. सायकल/स्कूटर/मोटरसायकल/मोपेड
३१. कार/जीप/व्हॅन
३२. कुटुंबामध्ये सेवन केले जाणारे मुख्य धान्य
३३. मोबाइल क्रमांक (केवळ जनगणनेशी संबंधित संवादांसाठी)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.