कोल्हापूर : कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो मध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक पोलीस वैष्णवी पाटील यांच्या कारचा कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून वैष्णवी पाटील यांच्यासह आणखी तिघे जण जखमी झाले आहेत.
वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना आज पहाटे बेंगळुरूहून कोल्हापूरकडे परतताना घडली. DYSP वैष्णवी पाटील ज्या इनोव्हा कारमधून प्रवास करत होत्या, त्या कारची अचानक समोरून येणाऱ्या लॉरीशी जोरदार धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघाताच्या वेळी कारमध्ये असलेल्या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघातानंतर जखमींना तातडीने चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार DYSP वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी इनोव्हा कार आणि लॉरी यांच्यातील जोरदार धडकेमुळे हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलासह अँटी करप्शन ब्युरोच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास कर्नाटक पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.