Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हॉटेलवर बोलवून तरुणीवर अत्याचार, काँग्रेस आमदाराला मध्यरात्री अटक, तीन तक्रारी दाखल

हॉटेलवर बोलवून तरुणीवर अत्याचार, काँग्रेस आमदाराला मध्यरात्री अटक, तीन तक्रारी दाखल


कॉंग्रेसचा निलंबित आमदार राहुल मामकुटातिल (वय ३६) याला पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे. बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली ही अटक करण्यात आली. आरोपी आमदाराला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, मामकुटातिल याच्यावर नोंदवण्यात आलेला हा बलात्काराचा तिसरा गुन्हा आहे. या अटकेमुळे केरळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ३१ वर्षीय महिलेने राहुल मामकुटातिल याच्या विरोधात ८ जानेवारी रोजी तक्रार दिली होती. पीडित महिलेने मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना पाठवलेल्या एका व्हॉईस मेसेजमध्ये आपल्यावर झालेला अत्याचार सांगितला होता. शिवाय कुटुंबाच्या सुरक्षेबाबत भीती व्यक्त केली होती. या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तातडीने कठोर कारवाईचे आदेश दिले. पीडित तरुणी सध्या परदेशात आहे. मात्र पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवण्यासाठी ती परदेशातून परतण्याची वाट न पाहता तातडीने सूत्रे हलवली. शनिवारी रात्री १२:३० च्या सुमारास पालक्कड येथील एका हॉटेलवर धाड टाकून पोलिसांनी राहुल मामकुटातिलला अटक केली.

नेमका आरोप काय आहे?
क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, राहुल मामकुटातिल यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ताज्या तक्रारीनुसार, ८ एप्रिल २०२४ रोजी तिरुवल्ला येथील एका हॉटेलमध्ये पीडितेवर अत्याचार करण्यात आला होता. तपासादरम्यान राहुल यांनी आपला फोन अनलॉक करण्यास नकार दिला, त्यानंतर पोलिसांनी त्यांचा फोन जप्त केला. त्यांची शारीरिक तपासणी आणि डीएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.
काँग्रेसने झटकले हात

राहुल मामकुटातिल यांच्यावर एकापाठोपाठ एक गंभीर आरोप झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्याच्यावर आधीच निलंबनाची कारवाई केली होती. रविवारी राहुल यांच्या अटकेनंतर ज्येष्ठ नेते के. मुरलीधरन यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. "आरोप समोर आल्यानंतर मामकुटातिलला पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे. आता आम्ही मामकुटातिलच्या कृत्याला उत्तरदायी नाही," असे त्यांनी ठणकावून सांगितलं.

न्यायालयीन कोठडी
गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की, राहुल मामकुटातिल हे प्रभावशाली व्यक्ती असल्याने ते फिर्यादीला धमकावू शकतात किंवा पुरावे नष्ट करू शकतात. ही बाजू ग्राह्य धरून न्यायालयाने त्यांना तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.