लाचखोर ऑफिसर म्हणून ओळख; लाचेसाठी अधिकाऱ्यांवर टाकायची दबाव, ACBने सापळा रचला अन् वन संरक्षण अधिकाऱ्याच्या पर्दाफाश
बुलढाणा: अवैधपणे तोडलेल्या झाडांच्या वाहतुकीसाठी लाच घेतल्याप्रकरणी बुलढाणा येथील सहायक वन संरक्षक अधिकारी अश्विनी आपेट हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत तिच्यासोबत लिपिक अमोल मोरे यालाही अटक करण्यात आली आहे. 15 हजार रुपये लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.
अश्विनी आपेट ही 2016 बॅचची रेंज फॉरेस्ट ऑफिसर असून मागील वर्षीच तिला सहायक वन संरक्षक अधिकारी पदावर बढती मिळाली होती. ती सध्या बुलढाणा वनविभागात कार्यरत होती. वनविभागाच्या हद्दीत अवैधरित्या तोडलेल्या झाडांची वाहतूक करण्यासाठी तिने संबंधित व्यक्तीकडे 30 हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. त्यापैकी अॅडव्हान्स म्हणून 15 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी आपेट हिच्याविरोधात यापूर्वीही पैशांबाबत अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या. मात्र त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर तपास करून सापळा रचण्यात आला आणि तिला लाच घेताना पकडण्यात आले. वनविभागातील काही कर्मचाऱ्यांकडून अश्विनी आपेट हिच्याबाबत दबाव टाकून पैसे गोळा करण्यास सांगितले जात असल्याचीही माहिती समोर आली आहे. तिची सुरुवातीची पोस्टिंग बीड जिल्ह्यातील केज रेंजमध्ये झाली होती. त्या काळातही अशाच स्वरूपाच्या तक्रारी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील तपास सुरू असून, वनविभागातील इतर अधिकारी किंवा कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. या कारवाईमुळे बुलढाणा जिल्ह्यातील वनविभागात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.