शिरसगाव काटा (ता. शिरूर) सजातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) प्रमीला नागेश वानखेडे (वय ४४) यांना ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, शिरूर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका तक्रारदाराच्या वडिलाेपार्जित जमिनीचा पंचनामा त्यांच्या बाजूने करण्यासाठी आणि पुढील प्रशासकीय कामात मदत करण्यासाठी वानखेडे यांनी सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली. १६ जानेवारी रोजी न्हावरे-तळेगाव रोडवरील छत्रपती संभाजी चौक येथे सापळा रचण्यात आला. तडजोडीअंती ७ हजार रुपये लाच घेण्याचे ठरले होते.
दुपारी दोनच्या सुमारास ही रक्कम स्वीकारताना पथकाने वानखेडे यांना पंचासमक्ष ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधिक्षक भारती मोरे करत आहेत.या कारवाईच्या निमित्ताने शिरूर तहसील कार्यालयातील भोंगळ कारभाराबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तालुक्यातील अनेक सजांमध्ये तलाठी वारसाच्या नोंदी, खरेदीच्या नोंदी आणि पंचनाम्यासाठी नागरिकांना वेठीस धरत असल्याच्या तक्रारी आहेत. तहसील कार्यालयातील हक्क नोंद विभागात साध्या कामांसाठी सहा-सात महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. कलम १५५ अन्वये चूक दुरुस्तीची कामे केवळ तारखा देऊन लांबणीवर टाकली जात असल्याने शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक हाल होत आहेत.
निर्वी येथील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक अशोक सोनवणे यांनी आपली कैफियत मांडताना सांगितले की, केवळ किरकोळ नाव दुरुस्तीसाठी त्यांना गेल्या सात महिन्यांपासून पुण्याहून येऊन तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रत्येक वेळी केवळ पुढील तारीख देऊन त्यांना माघारी धाडले जात आहे. महसूल विभागातील या दिरंगाईमुळे आणि भ्रष्ट प्रवृत्तीमुळे सामान्य माणसाचा संयम संपत चालला असून, वरिष्ठ प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.