Big Breaking! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 22 लॉकर फोडलेआटपाडी तालुक्यातील झरे येथील घटना; बँकेची कॅश मात्र सुरक्षित
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आटपाडी तालुक्यातील झरे गावात असलेल्या शाखेत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी बँकेतील तब्बल २२ लॉकर गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील ऐवज लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने बँकेतील रोख रक्कम सुरक्षित आहे.
गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे बँक उघडण्यासाठी कर्मचारी आले असता लॉकर रूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. काही लॉकर तुटलेले व कापलेले आढळल्याने तातडीने बँकेचे वरिष्ठ अधिकारी व पोलिसांना माहिती देण्यात आली. प्राथमिक पाहणीत चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून लॉकर फोडल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरट्यांनी बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूच्या खिडकीतून आत प्रवेश केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे, बँकेतील कॅश काउंटर व तिजोरीला कोणतीही इजा करण्यात आलेली नाही. त्यामुळे चोरट्यांचा मुख्य उद्देश लॉकरमधील ऐवज लंपास करण्याचा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या लॉकरमधून नेमका किती व काय मुद्देमाल चोरीला गेला आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. संबंधित लॉकरधारक ग्राहक बँकेत येऊन आपापल्या लॉकरची तपासणी केल्यानंतरच नुकसानाचा अचूक आकडा समोर येणार असल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम वेगात सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे डारे व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.