भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, तमाशाचा एवढा नाद लागलाय की तुणतुणे... ; जयंत पाटलांची जहरी टीका
आज भाजप पक्षाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तराप्रमाणे झाली आहे. या चित्रपटात मास्तराला तमाशाचा इतका नाद लागला की मास्तरच तुणतुणे हातात घेऊन पुढे उभा राहायला लागला अशी जहरी टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केली. 'ये बंद करने आए थे तवायफोके कोठे, मगर सिक्को की खणक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे', अशा शेरोशायरीतून जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला. सांगली महापालिकेच्या प्रचारसभेत बोलत असताना जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
सध्याची भाजप ही काँग्रेस युक्त भाजप
जयंत पाटील म्हणाले की, "भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांनी वेगवेगळ्या आघाड्या एकत्र करुन सत्ता बनवण्याचे नाकारल्याचे उदाहरण आहे. मात्र आज भाजप काय करतेय? सगळे काँग्रेसमधील ओढून भाजपमध्ये नेले आहेत. आता आपले गडी देखील तिथे चाललेत. काँग्रेस सर्व धर्मभावाचा विचार घेऊन चालते म्हणून तुम्ही साथ दिली. काँग्रेस सोडून जातीयवादी झेंडा घेण्यापूर्वी त्या व्यक्तीने दहा वेळा विचार करायला पाहिजे. मात्र दुर्दैवाने ती परिस्थिती नाही."
जयंत पाटील म्हणाले की, "भाजपवाले सांगतात की ते हिंदुत्ववादी आहेत आणि अकोल्यात एमआयएम सोबत युती करतात. ओवैसींच्या मांडीला मांडी लावून बसतात. यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत, हे लक्षात घ्या. सत्तेसाठी कुणाशीही आघाडी करायला यांना काही वाटत नाही. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेला भाजप आता काँग्रेसयुक्त झाला आहे." व्यक्तीला मतदान करा. साध्या मनाची, सुशिक्षित उमेदवार आम्ही दिले आहेत. ज्यांनी पक्ष बदलले त्यांना हिसका दाखवा. विचाराच्या मागे सांगली राहते हे दाखविण्याची हीच वेळ आहे असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.
निष्ठावंत भाजपवाले सतरंजी उचलतात
नवा पर्याय म्हणून सांगलीकर या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीला स्वीकारतील असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला. तसंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर अजित पवार आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपावरही त्यांनी भाष्य केलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंबंधी मला काही माहिती नाही असं जयंत पाटील म्हणाले.दोन दिवसांपूर्वीही जयंत पाटलांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. काँग्रेसला या देशातून हाकला असं भाजपचे लोक म्हणत होते, मात्र आजची भाजप ही काँग्रेसयुक्त भाजप झाल्याचा हल्लाबोल जयंत पाटलांनी केला. तर भाजपात एवढे काँग्रेसचे लोक गेलेत की निष्ठावंत भाजपवाले सतरंज्या उचलतायत, तर जे काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेत त्यांनी भाजप पक्षाचा ताबा घेतला आहे अशी खरमरीत टीकाही जयंत पाटलांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.