मुंबई : मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान कचरा उचलणाऱ्या लोकलला अचानक मोठी आग लागण्याची घटना गुरुवारी रात्री घडली. परिणामी ऐन गर्दीच्यावेळी लोकलसेवा विस्कळीत झाली. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली आग लागलेला कचरा उचलणाऱ्या मक स्पेशल लोकलचा पहिला डबा होता, ज्यामध्ये रुळांवरून आणि रेल्वे मार्गांवरून गोळा केलेला कचरा आणि गाळ भरलेला होता.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग लागलेला हा कचरा वाहून नेणारा विशेष डबा कुर्ल्यातील ईएमयू साइडिंगवर उभा होता. आम्ही तात्काळ आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. आग विझवण्यासाठी ओव्हरहेड केबलचा विद्युत पुरवठा खंडित करावा लागला होता. विद्याविहार आणि सायन रेल्वे स्टेशन दरम्यान रात्री ८.३८ ते ८:५५ या वेळेत हा पुरवठा खंडित झाल्याने अप धिम्या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. परिणामी कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे हाल झाले. दरम्यान आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.