Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

७० हजार कोटींचा घोटाळा लपवण्यासाठीच अजित पवार भाजपात आले; महेश लांडगे यांचा घणाघात

७० हजार कोटींचा घोटाळा लपवण्यासाठीच अजित पवार भाजपात आले; महेश लांडगे यांचा घणाघात


पिंपरी: सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा लपविण्यासाठी अजित पवार हे भाजपात आले. नसते आले तर, काय झाले असते. हे सर्वांना माहीत आहे. आधी त्यांनी स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहावेत, असे प्रत्युत्तर भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या 9 वर्षांतील भाजपाच्या सत्ताकाळात झालेल्या भ्रष्टाचारावरून सातत्याने आरोप करीत आहे. गुंडगिरी, दादागिरी व दहशत माजवून महापालिका अक्षरश: लुटून खाल्ल्याचा तोफ त्यांनी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचे नाव न घेता डागली आहे. अजित पवारांना प्रत्युत्तर देताना आ. लांडगे बोलत होते.

महेश लांडगे म्हणाले की, माझी प्रॉप्रर्टी किती आहे, त्याची कागदपत्रे मी दाखवतो. अगोदर त्यांच्या मुलाने काय केले ते पाहावे. सन 1991 पूर्वी ते काय होते. त्यांनी काय पराक्रम केले. तब्बल 30 वर्षे ते सत्तेत आहेत. पालकमंत्री आहेत. सलग 5 वेळा उपमुख्यमंत्री आहेत. त्यांची किती प्रॉप्रर्टी वाढली. त्यांना सोन्याचा परीस मिळाला आहे का, ऊर्जामंत्री असताना 70 हजार कोटींचा घोटाळा लपविण्यासाठी ते भाजपात आले. आले नसते तर, काय झाले असते हे त्यांना विचारा. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्याला उत्तर दिले आहे की, आम्ही यांना का सांभाळले आहे. मला जास्त बोलायला लावू नका. सध्या अजित पवारांचा अहंकार बोलतोय. ते नैराश्यात आहेत. बिनबुडाचे आरोप करीत आहेत. एक टीम त्यांना लिहून देत आहे. ते वाचून ते आमच्यावर आरोप करत आहेत. आरोप करून आता कोण मोठे होत नाही. ते प्रगल्भ नेते राहिलेले नाहीत. त्यांची चिडचिड वाढली आहे. राजकारणातून निवृत्त होण्याची वेळ आली आहे. मला त्यांनी मोठे केले नाही. शहरातील लोकांनी मोठे केले. अपक्ष म्हणून मी आमदार झालो. ते स्थानिक पदाधिकाऱ्यांना मोठे होऊ देत नाहीत. स्थानिक नेतृत्व त्यांना नकोय. शहरातील लोकांनी त्यांच्या बारामतीच्या दरवाज्यासमोर हजेरी लावावी, अशी त्यांची इच्छा आहे. राजे किंवा मालक नसून, लोकप्रतिनिधी आहोत, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला त्यांनी अजित पवारांना दिला.


शहरात त्यांना कोण ओळखत नाही

नेते शरद पवार यांनी त्यांना 1991 ला खासदार केले. त्यांना पिंपरी-चिंचवड शहरात कोण ओळखत होते. त्यांना मोठे करणाऱ्या शरद पवारांची साथ त्यांनी सोडली. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, त्यांना दूरदृष्टी ठेवून पिंपरी-चिंचवडचा सर्वसमावेशक विकास करता आला नाही, अशी टीका आमदार महेश लांडगे यांनी केली.

‌'ते‌' महाराष्ट्राचे आका

अजित पवार हे मला पिंपरी चिंचवडचा ‌'आका‌' म्हणताहेत, मुळात तेच महाराष्ट्राचे आका आहेत. हे सर्वांना माहिती आहे. असे प्रत्युत्तर भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांना दिले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.