वाडा : तालुक्यातील पोशेरी येथे असलेल्या आयडियल फाऊंडेशन काॅलेजच्या फिजिओथेरपी अभ्यास क्रमाकरिता चार दिवसापूर्वी प्रवेश घेतलेल्या एका हिंदू विद्यार्थिनीला रात्रीच्या वेळी जबरदस्तीने अधिक्षिका व अन्य मुस्लिम धर्मीय विद्यार्थिनींनी नमाज पढायला लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या संदर्भात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त करीत विविध हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आयडियल काॅलेजवर गर्दी केली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पोशेरी येथील आयडियल फाऊंडेशनच्या उच्च व तंत्र शिक्षणातील विविध विद्या शाखांना मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. चार दिवसापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील अश्विनी बिन्नर या विद्यार्थिनीने फिजिओथेरपी अभ्यास क्रमाकरिता प्रवेश घेतला आहे. काॅलेजच्याच वसतीगृहात अन्य विद्यार्थिनी सह ती राहत होती.
दरम्यान, रविवार दि.4 च्या रात्री सुमारे 11 वाजेच्या दरम्यान वसतीगृहाच्या अधिक्षिका व अन्य दोन मुस्लिम विद्यार्थिनींनी अश्वीनी हिस जबरदस्तीने नमाज पढायला लावले. या प्रकाराने भेदरलेल्या अश्विनीने घडलेल्या प्रकाराची माहिती आपल्या पतीला व वडिलांना कळवली. त्यानंतर संबंधित काॅलेज प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार केल्या नंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संबंधित महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.या गंभीर प्रकाराने सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये या करिता पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेत तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.त्यानंतर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. गुन्ह्याचा अधिक तपास वाडा पोलीस करीत आहेत.
हा रॅगिंग संदर्भातील तक्रार समोर आली असून या संदर्भातील गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर जिल्ह्यातील विद्यार्थांनी न घाबरता पुढे यावे असे आवाहन पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी केले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.