पुणे : 'राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खासगी शाळांना प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी) देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम आयोजित करणे अनिवार्य आहे. या उपक्रमात १०० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे उद्दिष्ट असून, शाळांना परस्पर सुटी देता येणार नाही,' अशी माहिती शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी गुरुवारी दिली.
प्रजासत्ताकदिनानिमित्त होणाऱ्या सामूहिक कवायत संचलन उपक्रमाबाबत राज्य मंडळात झालेल्या पत्रकार परिषदेत सिंह यांनी माहिती दिली. राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी, सहसंचालक हारून अतार या वेळी उपस्थित होते. शिक्षण विभागातर्फे या पूर्वी स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर गीतांवर कवायत संचलन कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यानंतर आता प्रजासत्ताकदिनीही हा उपक्रम राबवला जाणार आहे.सिंह म्हणाले, 'राष्ट्र प्रथम या संकल्पनेवर आधारित असलेली देशभक्तीपर गीतांवरील सामूहिक कवायत शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर होणार आहे. सुमारे वीस मिनिटे कालावधीचा हा कार्यक्रम असेल. 'आनंददायी शनिवारी' विद्यार्थ्यांच्या कवायतींचा सराव करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, व्यायाम यांसाठी प्रेरित करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे.''एनसीसी, स्काउटच्या विद्यार्थ्यांची कवायतीसाठी मदत घेता येते. कवायतीचा फायदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातही होतो. एकाच परिसरात असलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी एकत्रितपणे संचलन कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व शासकीय, खासगी शाळांतील २ कोटी १० लाख विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. या दिवशी विद्यार्थी गैरहजर न राहता १०० टक्के उपस्थिती राहील, याची दक्षता शाळांनी घेतली पाहिजे,' असे सिंह यांनी नमूद केले.
क्रीडा शिक्षकांसाठी पदनिर्मिती
'विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच खेळ, व्यायामही महत्त्वाचा आहे. त्यामुळे शाळांना क्रीडा शिक्षक उपलब्ध करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ४ हजार ८६० केंद्र शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची पदनिर्मिती करण्यात आली आहे. या पदांवर आता शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे,' असे शिक्षण आयुक्तांनी स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.