Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुर्दैवी घटना! सांगली शहरातील नर्सरीतील शेडला भीषण आग; विवाहितेचा होरपळून मृत्यू, पती झाला पसार, नेमंक काय घडलं..

दुर्दैवी घटना! सांगली शहरातील नर्सरीतील शेडला भीषण आग; विवाहितेचा होरपळून मृत्यू, पती झाला पसार, नेमंक काय घडलं..

सांगली : शहरातील विश्रामबाग परिसरात असलेल्या शंभर फुटी रोडवरील शांतीबन चौक येथे एका नर्सरी मधील पत्रावजा शेडला आज रात्री साडे दहाच्या सुमारास अज्ञात कारणातून भीषण आग लागली. या आगीत विवाहितेचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


निकिता शिव मनगुळे (वय 25 मूळ राहणार कागवाड, बसवनगर) असे मृत महिलेचे नाव असून संशयित पती शिव मनगुळे हा पसार झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी काही संशयास्पद गोष्टी समोर आल्याने पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शंभर फुटी रोडवर चौकात एक नर्सरी आहे. देखभालीसाठी कर्नाटकातील एक दाम्पत्य या ठिकाणी राहत होते.

शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते राहत असलेल्या पत्र्याच्या शेडला भीषण आग लागली. धुराचे मोठे लोट येऊ लागले. बघता बघता काही क्षणात आगीने रौद्ररूप धरण केले. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास सदरची घटना येताच त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला सदरच्या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी सुनील माळी, प्रसन्न पाटील, दत्त पाटील, सुरेश अलगुर यांच्या पथकाने धाव घेतली. मात्र, या भीषण आगीत महिलेचा होरपळून मृत्यू झाला.

दरवाजाला कडी लाऊन पतीचे पलायन...

१०० फुटी रस्त्यावरील कोळी यांच्या मयुर नर्सरीत असणाऱ्या शेडमध्ये दाम्पत्य राहत होते. आगीच्या घटनेनंतर मृत महिलेचा पती घटनास्थळावरून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पत्र्याच्या शेडला बाहेरून कडी लावली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी पत्र्याचे शेड उचकटून आत प्रवेश करत आगीवर नियंत्रण मिळवले. ही घटना संशयास्पद असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.