मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारीला झालेल्या धक्कादायक विमान अपघाती निधनाने महाराष्ट्र आजही सुन्न आहे. मात्र, राजकारणाचे चक्र थांबत नाही. दादांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी आता त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री म्हणून आज सांयंकाळी शपथ घेणार आहेत.
राज्याच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळणार आहे. अजितदादांच्या निधनानंतर पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असतानाही सुनेत्रा पवारांचे नाव अचानक कसे समोर आले, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ब्रँडिंग करणारे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. लाडकी बहीण योजनेचा ‘पिंक’ प्रचार घराघरात पोहोचवणाऱ्या अरोरा यांनीच सुनेत्रा पवारांशी संपर्क साधून त्यांना ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार केले. छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या नेत्यांच्या चर्चेनंतर, सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. सुनेत्रा पवार जरी उपमुख्यमंत्री होत असल्या तरी, अजितदादांकडे असलेले सर्वात शक्तिशाली ‘अर्थ आणि नियोजन’ खाते सध्या भाजपकडे (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे) जाण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवारांकडे क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती सोपवली जाऊ शकतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.